एसटीतील प्रथमोपचार पेट्या झाल्या गायब
By Admin | Updated: June 8, 2014 00:55 IST2014-06-08T00:21:09+5:302014-06-08T00:55:13+5:30
रवींद्र भताने , चापोली सर्वसामान्यांच्या प्रवासाचे साधन म्हणजे एस.टी. बस. ती सर्वसामान्यांची जीवनवाहिनीच बनली आहे़

एसटीतील प्रथमोपचार पेट्या झाल्या गायब
रवींद्र भताने , चापोली
सर्वसामान्यांच्या प्रवासाचे साधन म्हणजे एस.टी. बस. ती सर्वसामान्यांची जीवनवाहिनीच बनली आहे़ मात्र महामंडळाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी धावणाऱ्या अनेक बसमधील प्रथमोपचार पेट्याच गायब झाल्या आहेत़ तसेच ज्या बसमध्ये प्रथमोपचार पेट्या आहेत. त्यामधील औषधे गायब आहेत़
जनसामान्यांसाठी गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे बस याप्रमाणे परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास अविरत सुरू आहे़ सर्वसामान्यांचे प्रवासाचे साधन एस.टी. बस़ प्रवासासाठी गावागावातील प्रवासी आजही एस. टी. बसवर अवलंबून आहेत़ मात्र महामंडळाच्या बसला आव्हान म्हणून खाजगी वाहनांची समांतर यंत्रणा उभी राहत असली तरीही महामंडळाच्या बससारखा आरामदायी प्रवास नसल्याने अनेक प्रवाशांचा आजही तिकडेच ओढा आहे़ एस.टी.चा प्रवास सर्वात सुखकर त्यामुळे कितीही दूरवरचा प्रवास असेल तर प्रवासी एस.टी.ला पसंती देतात़
एस.टी. बसला जर अपघात झाला तर अपघाताच्या वेळी तातडीने प्रथमोपचार करता यावा, यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रथमोपचार पेटी बसविण्यात आली आहे़ अपघात ठिकाणापासून दवाखाना दूर असला तरी तिथेच प्रथमोपचार केल्यावर प्रवाशाचा जीव वाचू शकतो़ मात्र एस.टी.मधील चालक, वाहक किंवा आगारातील कर्मचारी कुणीही लक्ष देत नसल्याचे प्रथमोपचार पेटीलाच प्राथमिक उपचाराची गरज आहे़ काही एस.टी. बसची पाहणी केली असता त्यापैकी बहुतांश बसमधील प्रथमोपचार पेटीच गायब असल्याचे आढळून आले आहे़
प्रथमोपचार पेट्या लवकरच बसवू
नवीन मागणी केलेल्या प्रथमोपचार पेट्या उपलब्ध झाल्या आहेत़ त्या काही दिवसांत बसमध्ये बसविण्यात येतील व ज्या पेट्यांमध्ये औषधे नाहीत त्यात औषधीसाठा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती आगारप्रमुख एस़पी़ जाधव यांनी दिली़