आगीत १९ लाखांचे साहित्य खाक

By Admin | Updated: February 8, 2016 00:16 IST2016-02-08T00:08:37+5:302016-02-08T00:16:48+5:30

तुळजापूर : शहरातील शुक्रवार पेठ भागातील एका घरासह इलेक्ट्रीक दुकानाला आग लागल्याने तब्बल १९ लाख ३५ हजार रूपयांचे साहित्य जळून खाक झाले़

Fireworks worth Rs 19 lakh | आगीत १९ लाखांचे साहित्य खाक

आगीत १९ लाखांचे साहित्य खाक


तुळजापूर : शहरातील शुक्रवार पेठ भागातील एका घरासह इलेक्ट्रीक दुकानाला आग लागल्याने तब्बल १९ लाख ३५ हजार रूपयांचे साहित्य जळून खाक झाले़ ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली असून, आठवड्यातील आगीची ही दुसरी घटना असल्याने एकच खळबळ उडाली आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शुक्रवार पेठ भागात राहणारे आनंत भारत घोडके यांच्या घराला शनिवारी रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली़ या आगीत घोडके यांच्या घरातील ५० हजाराचे संसारोपयोगी साहित्य, ३० हजाराचे अन्नधान्य, २९ हजाराचे पत्र्याचे शेड असा जवळपास १ लाख ३५ हजाराचा मुद्देमाल जळून खाक झाला़
घोडके यांच्या घराच्या शेजारीच असलेले शेषेराव अंबादास गोळते यांच्या नवनीत मंडप व इलेक्ट्रीक दुकानाला अचानक आग लागली़ या आगीत मंडपाचे साहित्य, स्पिकर साहित्य, लाईटच्या माळा, इलेक्ट्रीक बोर्ड, मंडपाचे कापड, इलेक्ट्रीक झुंबर, एल़ई़डी़ लाईट, स्टेज, डेकोरेशन, मॅटर लाईट, अंथरायचे मॅट, डी़जे़साऊंड सिस्टीम व इतर असे जवळपास १८ लाख रूपयांचे साहित्य जळून खाक झाले़ या घटनेचा तलाठी बाळासाहेब पवार यांनी पंचनामा केला असून, तुळजापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
मागील आठवड्यात उस्मानाबाद रोडवरील एका घराला आग लागून लाखो रूपयांचे साहित्य खाक झाले होते़ तर शनिवारी रात्री एका घरासह दुकानाला आग लागून जवळपास २० लाखांचे नुकसान झाले आहे़ या दोन्ही भीषण अपघाताच्या घटनांमध्ये पालिकेची अग्निशमन दलाची गाडी मदत कार्यासाठी हजर राहू शकली नाही़ तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर शहरातील अग्निशमन दलाची गाडी बंद राहणे ही दुर्दैवाची बाब असून, पालिकेने याकडे लक्ष देवून गाडीची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे़ (वार्ताहर)

Web Title: Fireworks worth Rs 19 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.