हिंदुस्थान कंपनीला आग
By Admin | Updated: June 7, 2014 00:52 IST2014-06-07T00:39:42+5:302014-06-07T00:52:59+5:30
जायकवाडी : पैठण औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान कंपोझिटस् या कंपनीला शुक्रवारी सकाळी ६ वाजता भीषण आग लागून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
हिंदुस्थान कंपनीला आग
जायकवाडी : पैठण औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान कंपोझिटस् या कंपनीला शुक्रवारी सकाळी ६ वाजता भीषण आग लागून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी साडेचार तास अथक परिश्रम घेतल्यानंतर ही आग आटोक्यात आली.
पैठण एमआयडीसीत वाहनांचे ब्रेक लायनर तयार करणारी ही कं पनी असून सकाळी ६ वाजता अचानक स्टोअर रूमला प्रथम आग लागली. क्षणार्धात आगीने संपूर्ण कंपनीच्या इमारतीला कवेत घेतले. शार्टसर्कि टमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. सकाळी स्टोअर रूमच्या इमारतीतून धूर निघत असल्याचे सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ ही बाब कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली. तातडीने अग्निशन दलाला माहिती देण्यात आली. सर्वप्रथम पैठण औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली; परंतु आगीने रौद्र रूप धारण केल्याने एका बंबाकडून ही आग आटोक्यात येणे शक्य नाही म्हणून औरंगाबाद मनपा व पैठण नगरपालिकेतील अग्निशमन दलाच्या गाड्या लगेच आल्या. तीनही बंबातील पाणी अपुरे पडत असल्याने खाजगी टँकरने पाणी मागविण्यात आले. त्यानंतर दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही आग आटोक्यात आली. आज शुक्रवार असल्याने कंपनीला सुटी होती, त्यामुळे कंपनीत कामगार नसल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत कंपनीतील कच्चा माल, इंजिनिअरिंग मटेरियल, संगणक, पक्का माल, पॅकिंग मटेरियल आदी कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच कंपनीचे उपाध्यक्ष जी.एम. इंदापवार, आर. एन. महाजन, एम ए. जानकर, एस. एम. कुलकर्णी, आर. एम. जोशी, जी. टी. काकडे, आर. टी. क्षीरसागर, बी. आर. बटुळे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन नुकसानीची माहिती घेतली. कंपनीतील उत्पादन प्रक्रिया दोन-तीन दिवसांनी पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, या कंपनीला या पूर्वीही अशीच लाग लागून कोट्यवधींचे नुकसान झाले होते.
कामगार मदतीला धावले
या कंपनीतील कामगार सुटी असूनही धावत आले व त्यांनी आग विझविण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. बापू गहाळ, सय्यद गफूर, रफिक शेख, बाळू चौधरी, एस.एल. जाधव, शेख महेमूद, सुनील भाग्यवंत, विठ्ठल गहाळ, फैयाज शेख, मेडिएटर्सचे सुरक्षा अधिकारी एम. ए. शेख, घाडीगावकर आदी कामगार दिवसभर मदत कार्यासाठी उपस्थित होते. आग आटोक्यात आणण्यासाठी पैठण एमआयडीसी अग्निशमन केंद्राचे कर्मचारी एस. टी. महाडिक, एस.टी. पाटील, व्ही.के . शिंदे, ए. एम. अबदागीर, एस. बी. निघूट, जी. के . झाटे, एस. के . खंबाट यांच्यासह औरंगाबाद मनपा व पैठण मनपाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
टँकरच्या पाण्यामुळे आगीवर नियंत्रण
भीषण आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या वाहनांना कंपनीतून पाणी मिळाले नाही, त्यामुळे आग विझविताना अडचणी येत होत्या; परंतु एमआयडीसीचे कर्मचारी बी. यु. सानप यांनी तात्काळ एमआयडीसीच्या पॉइंटवर जाऊन खाजगी टँकरद्वारे अग्निशमन वाहनांना पाणी पुरविल्याने आग आटोक्यात येण्यास मदत झाली.