नऊ वर्षांपासून अग्निशमन बंब वाट पाहतोय आग विझविण्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:08 IST2021-02-05T04:08:59+5:302021-02-05T04:08:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खुलताबाद : शहरासह परिसरात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नगर परिषदेने नऊ वर्षांपूर्वी अग्निशमन विभाग कार्यान्वित केला. ...

नऊ वर्षांपासून अग्निशमन बंब वाट पाहतोय आग विझविण्याची
लोकमत न्यूज नेटवर्क
खुलताबाद : शहरासह परिसरात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नगर परिषदेने नऊ वर्षांपूर्वी अग्निशमन विभाग कार्यान्वित केला. मात्र, शासनाने प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची पदेच न भरल्याने हा विभाग नावापुरताच राहिला आहे. नवीन बांधलेली प्रशस्त इमारत, कर्मचाऱ्यांचे निवासस्थान या वास्तू तेव्हापासून धुळखात पडलेल्या आहेत. त्यावेळी नव्यानेच मिळालेल्या अग्निशमन बंबाच्या गाडीने एकही आग विझवली नसल्याने या विभागाची ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी स्थिती झाली आहे.
खुलताबाद नगर परिषदेला अग्निशमन विभाग कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासनाने सन २०१०-११मध्ये अग्निशमन वाहन दिले. तसेच ७५ लाख रुपयांचा निधी दिला होता. या निधीतून कर्मचाऱ्यांसाठी बंगलो टाईप निवासस्थान, एक स्टोअर रूम, जाण्या-येण्यासाठी पक्का रस्ता पानमळा येथे करण्यात आला. त्याचबरोबर वाहन उभे करण्यासाठी आरसीसीचे शेड उभारण्यात आले. मात्र, दुर्देवाने नऊ वर्षांपासून शासनाने प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची पदे न भरल्याने हा विभाग नुसता नावापुरताच उरला आहे.
खुलताबाद शहर हे धार्मिक व पर्यटनस्थळ असून, याठिकाणी उरूस, यात्रा, हनुमान जयंतीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे खुलताबाद नगर परिषदेच्या अग्निशमन दलात प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची पदे भरणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा विभाग धुळखात पडला आहे.
चौकट
अनेकदा पत्रव्यवहार केला.
खुलताबाद नगर परिषदेने अग्निशमन दलातील जागा भरण्यासाठी शासनाच्या नगरविकास विभागाकडे अनेकदा पत्रव्यवहार केला. तसेच वेळोवेळी पाठपुरावाही केला. मात्र, शासनाने जागा भरल्या नसल्याची माहिती नगराध्यक्ष ॲड. एस. एम. कमर, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड यांनी दिली.
चौकट
न. प.तील अनेक महत्वाची पदेही रिक्तच
खुलताबाद नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षकपद गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहे. त्याचबरोबर मुख्याधिकारी ज्योती भगत-पाटील यांंची बदली झाल्याने अतिरिक्त कार्यभार गंगापूरचे मुख्याधिकारी संतोष आगळे यांच्याकडे आहे. त्यांना दोन्ही नगर परिषदेचा कारभार सांभाळताना कसरत करावी लागत आहे. तसेच नगर परिषदेतील तीन ते चार कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्याने ही पदेही रिक्तच आहेत.
फोटो कॅप्शन : खुलताबाद नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे वाहन या विभागाच्या शेडमध्ये असे पडून आहे.