मुलींच्या लग्नासाठी ठेवलेल्या ठेवी मिळेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2015 00:37 IST2015-04-24T00:33:42+5:302015-04-24T00:37:23+5:30
उस्मानाबाद : मागील तीन-चार वर्षांपासून चलन तुटवड्याचा सामना करणाऱ्या जिल्हा बँक निवडणुकीच्या आखाड्यात सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी उडी घेतली आहे.

मुलींच्या लग्नासाठी ठेवलेल्या ठेवी मिळेनात
उस्मानाबाद : मागील तीन-चार वर्षांपासून चलन तुटवड्याचा सामना करणाऱ्या जिल्हा बँक निवडणुकीच्या आखाड्यात सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी उडी घेतली आहे. या पक्षांकडून बँक अविरोध काढण्याची भाषा केली जात असली तरी अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. असे असतानाच दुसरीकडे मात्र, सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काच्या ठेवी मिळत नाहीत. मुलीच्या ठेवलेल्या ठेवीही मिळत नसल्याने गुरूवारी काही जणांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी धाव घेतली.
तुळजापूर तालुक्यातील किलज येथील मधुकर गुरसिद्ध कांबळे यांनी सलगरा (दी) येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत स्वत:च्या नावे सहा हजार रूपये. तसेच पत्नी गोपाबाई मधुकर कांबळे यांच्या नावे ८२ हजार रूपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. ही रक्कम मुलींच्या लग्नकार्यासाठी कामी येईल, या उद्देशाने ठेवली होती. तीन पैकी चांदणी मधुकर कांबळे हिचे लग्न ठरले आहे. त्यामुळे बँकेतील पैसे मिळावेत, यासाठी कांबळे हे मागील तीन ते चार महिन्यांपासून बँकेमध्ये चकरा मारीत आहेत. परंतु, बँकेकडून ठेवीतील छदामही मिळालेला नाही. तसेच उत्पन्नाचेही दुसरे कुठलेही साधन नाही. त्यामुळे हा विवाहसोहळा कसा पार पाडायचा? असा प्रश्न या कुटुंबासमोर उभा राहिला आहे. वारंवार खेटे मारूनही काहीच उपयोग होत नसल्याने अखेर मधुकर कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याकडे तक्रार करून ठेवी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
बडे मासे मोकाटच !
सर्वसामान्य कुटुंबांनी पै-पै जमा करून बँकेत ठेवले. परंतु, हे पैसे आज त्यांना गरज असतानाही मिळत नाहीत. असे असतानाच दुसरीकडे राजकारणाशी संबंधित असलेल्या अनेकांकडे कोट्यवधीची थकबाकी आहे. अशा धकबाकीदारांविरूद्ध कारवाई करण्यास ना सत्ताधारी ना अधिकारी इच्छुक आहेत. (प्रतिनिधी)