आर्थिक संकटाने संयम सुटला अन् आत्महत्येसाठी मायलेकी रेल्वेरुळावर बसल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 15:18 IST2020-09-17T15:14:37+5:302020-09-17T15:18:15+5:30
संग्रामनगर रेल्वे रुळावरील घटना

आर्थिक संकटाने संयम सुटला अन् आत्महत्येसाठी मायलेकी रेल्वेरुळावर बसल्या
औरंगाबाद : पतीच्या निधनामुळे कुटुंबाचा भार अंगावर पडला. चार दिवसांपूर्वीच एका मुलीचे लग्न लावून दिले. त्यासाठी जवळ होती नव्हती तेवढी जमापुंजी खर्च झाली. दैनंदिन खर्च, घरभाडे देण्यासाठी शिल्लक काहीच नाही. त्यामुळे हतबल झालेली महिला व तिच्या मुलीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मायलेकी रेल्वे रुळावर जाऊनही बसल्या. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचविण्यासाठी सतर्क नागरिकांना यश आले. विशेष म्हणजे दीड तासात दोन वेळा महिला रुळावर गेली आणि नागरिकांनी तिला वाचविले. यानंतर महिलेचे समुपदेशन करून जवाहरनगर पोलिसांनी मायलेकीला त्यांच्या घरी नेऊन सोडले. ही घटना बुधवारी सायंकाळी ५.१४ ते ६.२५ दरम्यान घडली. फराह सय्यद सलीम (रा. भारतनगर), असे महिलेचे नाव आहे.
या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, भारतनगर येथील रहिवासी महिलेच्या पतीचे ७ ते ८ महिन्यांपूर्वी निधन झाले. दोन मुलींसह ती किरायाच्या घरात राहते. तिने चार दिवसांपूर्वीच तिच्या मोठ्या मुलीचे लग्न लावून दिले. मुलीच्या लग्नामुळे तिच्याजवळची सर्व पुंजी संपली. दैनंदिन घर खर्चासाठी त्यांच्याजवळ पैसे नव्हते. किती दिवस उधारीवर जगायचे, हा विचार करून आपल्या ८ वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन फराह सय्यद या संग्रामनगर रेल्वे रुळावर येऊन बसल्या. परिसरातील सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत गोर्डे पाटील आणि अन्य नागरिकांची त्यांच्यावर नजर पडली. यावेळी रेल्वे इंजिन येत असल्याचा आवाज आल्याने नागरिकांनी पळत जाऊन त्यांना रुळावरून उठवले आणि बाजूला केले.
यानंतर माय-लेकीस जवळच्या अपार्टमेंटखाली नेऊन बसविले आणि महिलांना बोलावून त्यांना बोलते केले. यावेळी रडत माय-लेकीने त्यांच्यावर आर्थिक संकट आल्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगितले. यावेळी त्यांना कामधंदा उपलब्ध करून देण्याची तयारी गोर्डे पाटील यांनी दर्शविली. यानंतर तेथील नागरिक त्यांच्या कामात व्यस्त झाल्याचे पाहून सायंकाळी ६.२५ वाजेच्या सुमारास पुन्हा या माय-लेकी रुळावर जाऊन बसल्या. त्याचवेळी रेल्वेगाडी येऊ लागली. गाडीच्या भोंग्याच्या आवाजाने पुन्हा नागरिक रुळाकडे जाताच त्यांना पुन्हा माय-लेकी दिसल्या. त्यांना पुन्हा रुळावरून उठवून बाजूला नेले. या महिलेविषयी जवाहरनगर आणि पुंडलिकनगर पोलिसांना माहिती देण्यात आली.
पाच मिनिटांत पोलीस घटनास्थळी
जवाहरनगरचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून उपनिरीक्षक गायके आणि महिला पोलीस कर्मचारी सरला हिवाळे आणि अन्य पोलिसांना घटनास्थळी पाठविले. पोलिसांनी मायलेकीची समजूत काढून त्यांना भारतनगर येथील घरी नेऊन सोडले.