शेवटी ती आईच! बरणीत मुंडके अडकले, जीव कासावीस असतानाही कुत्रीने पिलांना पाजला पान्हा
By साहेबराव हिवराळे | Updated: October 23, 2023 16:50 IST2023-10-23T16:34:59+5:302023-10-23T16:50:01+5:30
कुत्रीच्या मुंडक्यात अडकलेली प्लास्टिकची बरणी निसर्गप्रेमींनी काढून तिचा जीव वाचवला.

शेवटी ती आईच! बरणीत मुंडके अडकले, जीव कासावीस असतानाही कुत्रीने पिलांना पाजला पान्हा
छत्रपती संभाजीनगर : पाणी पिण्यासाठी गेलेल्या कुत्रीचे प्लास्टिकच्या बरणीत मुंडके अडकून ती कासावीस झाल्याचे गारखेड्यात रविवारी दुपारी निदर्शनास आले. त्या अवस्थेतही ती पिलांना दूध पाजत होती. निसर्गप्रेमींनी अथक परिश्रमाने तिचा जीव वाचविला.
गारखेडा परिसरात इंदिरानगर भागात स्टेडियमच्या पाठीमागे स्मशानभूमीच्या नाल्याच्या बाजूला ही घटना घडली. श्वास गुदमरत असल्याने ही कुत्री सैरभैर पळत होती; पण पिलांच्या जवळ कुणाला येऊ देत नव्हती. तिची सहा छोटी पिले आहेत. हे दृश्य पाहून तेथे खेळणाऱ्या लहान मुलांनी ही माहिती कमलेश उमके यांना दिली. त्यांनी मदतीसाठी निसर्गप्रेमींना कळविले.
बरणीत मुंडके अडकून कासावीस झाली कुत्री; त्या अवस्थेतही पिलांना पाजत होती पान्हा ! #ChhatrapatiSambhajinagarpic.twitter.com/EOE5Uq4ud4
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) October 23, 2023
लाईफ केअर संस्थेचे सचिव जयेश शिंदे यांनी सांगितले की, कुत्री ओळखीची नसल्यामुळे ती पिलांजवळ येऊ देत नव्हती. लाईफ केअर संस्थेचे मनोज गायकवाड, दाऊद शेख, कमलेश उमके यांनी फासा तयार करून तिच्या गळ्यात अलगद फेकला. कुत्रीला पक्के पकडून ती प्लास्टिकची बरणी हलकेच तिच्या गळ्यातून काढली व कुत्रीला मुक्त केले. लहान मुले आणि कमलेश उमके यांच्या सहकार्यामुळे त्या कुत्रीला व पर्यायाने तिच्या पिलांनाही वाचवण्यात यश आले.