अखेर पणन महामंडळाने दार उघडले

By Admin | Updated: May 16, 2014 00:08 IST2014-05-15T23:33:06+5:302014-05-16T00:08:29+5:30

लातूर : अतिरिक्त एमआयडीसी भागात पणन महामंडळाच्या वतीने आंबा-डाळिंब निर्यात सुविधा केंद्र उभे करण्यात आले आहे़

Finally, the marketing corporation opened the door | अखेर पणन महामंडळाने दार उघडले

अखेर पणन महामंडळाने दार उघडले

लातूर : लातूरचा शेतकरी फलोत्पादनाच्या माध्यमातून देश-विदेशात पोहोचावा, या उदात्त हेतूने अतिरिक्त एमआयडीसी भागात पणन महामंडळाच्या वतीने आंबा-डाळिंब निर्यात सुविधा केंद्र उभे करण्यात आले आहे़ गारपिटीतून बचावलेले आंबे शास्त्रोक्त पद्धतीने पिकविण्यासाठी काही शेतकर्‍यांनी या केंद्राकडे धाव घेतली़ मात्र, स्थानिक केंद्रातून पाठविलेल्या प्रस्तावाला पणन महामंडळाने थोड्या विलंबानेच परवानगी दिली़ अखेर या केंद्रातील प्रक्रिया युनिटचे दार आता उघडले आहे़ लातूर जिल्ह्यातील फलोत्पादन क्षेत्र वाढीस लागले आहे़ प्रामुख्याने आंबे, डाळिंब व द्राक्षांचे चांगले उत्पादन शेतकरी घेत आहेत़ त्याअनुषंगाने या फलोत्पादकांना निर्यातक्षम फळांची निर्मिती करता यावी, त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया व्हावी यासाठी स्व़विलासराव देशमुख यांनी पुढाकार घेऊन लातूरच्या अतिरिक्त एमआयडीसीत आंबा-डाळिंब निर्यात सुविधा केंद्राची उभारणी करण्यात आली़ अत्यंत देखणी इमारत उभी करुन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ‘रायपनिंग चेंबर’ तयार करण्यात आले़ प्रारंभीच्या काळात शेतकर्‍यांनी आंबा, केळी अशा फळांवर याठिकाणी प्रक्रिया करुन घेतली़ मात्र यंदा येथील शास्त्रोक्त पद्धतीने फळ पिकविणारे रायपनिंग चेंबरची दारे शेतकर्‍यांसाठी बर्‍याच उशिरा खुली झाली़ लातूर परिसरातील तीन ते चार शेतकर्‍यांनी गारपिटीतून बचावलेले आंबे शास्त्रोक्त पद्धतीने पिकवून घेण्यासाठी पणन महामंडळाच्या सुविधा केंद्राच्या अधिकार्‍यांची भेट घेतली़ त्यानुसार स्थानिक अधिकार्‍यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे रायपनिंग चेंबर सुरु करण्याची परवानगी मागितली़ परंतु, पणनने उशिरा परवानगी दिल्याने शेतकर्‍यांना येथील सुविधेचा पूर्णपणे लाभ घेता आला नाही़ हंगाम संपण्याच्या मार्गावर असताना आता पणनने परवानगी दिली आहे़ आंबा-डाळिंब निर्यात सुविधा केंद्रात प्रत्येकी २५ टन क्षमतेच ५ रायपनिंग चेंबर आहेत़ हंगामात एकावेळी १२५ टन फळांवर याठिकाणी प्रक्रिया होऊ शकते़ त्याअनुषंगाने चार ते पाच शेतकर्‍यांनी आंबे प्रक्रियेसाठी आणले आहेत़ जवळपास ६ टन आंब्यावर प्रक्रिया झाली असून, अजूनही प्रक्रिया करण्याचे काम सुरुच असल्याचे सुविधा केंद्रातील सहाय्यक सरव्यवस्थापक एम़डी़ बरडे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)

Web Title: Finally, the marketing corporation opened the door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.