अखेर सराफा दुकाने उघडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2016 00:53 IST2016-04-13T00:40:40+5:302016-04-13T00:53:29+5:30
औरंगाबाद : अबकारी कराविरोधात सराफा व सुवर्णकारांनी पुकारलेला बेमुदत बंद अखेर ४१ दिवसांनंतर मागे घेतला आहे. मंगळवारी

अखेर सराफा दुकाने उघडली
औरंगाबाद : अबकारी कराविरोधात सराफा व सुवर्णकारांनी पुकारलेला बेमुदत बंद अखेर ४१ दिवसांनंतर मागे घेतला आहे. मंगळवारी दुपारनंतर शहरातील ७० टक्के सराफा दुकानांचे शटर उघडण्यात आले. या बेमुदत बंदमुळे सराफा व्यापाऱ्यांनी व्यापारी विश्वात एक नवा इतिहास घडविला.
औरंगाबाद सराफा असोसिएशनने सोमवारी सायंकाळी बैठक घेऊन बुधवार, दि.१३ रोजीपासून सराफा दुकाने उघडण्याचा अधिकृत निर्णय घेतला होता. मात्र, मंगळवारी दुपारनंतर शहरातील ७० टक्के सराफा दुकानदारांनी आपले दुकान उघडले. बुधवारपासून शहरातील सर्वच ४०० पेक्षा अधिक सराफा दुकाने उघडणार आहेत. तसेच सुवर्णकारही आपला व्यवसाय सुरू करणार आहेत. यामुळे ग्राहक व सराफा दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऐन लग्नाच्या हंगामातच सोन्याची दुकाने बंद असल्याने ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता; पण आता ही दुकाने उघडल्याने येत्या लग्नतिथीला बहुल्यावर चढणारे नवरदेव व नवरीचे चेहरे आनंदाने खुलले आहेत.
केंद्र सरकारने सोन्यावर १ टक्का अबकारी कर लावल्याचा विरोधात सराफा व सुवर्णकारांनी २ मार्चपासून बेमुदत बंद पुकारला होता. दिल्ली येथे देशभरातील सराफा संघटनांच्या निवडक प्रतिनिधींनी एकत्र येऊन अॅक्शन कमिटी निवडली होती. या कमिटीने केंद्र सरकारला प्रस्ताव देण्याचे ठरविले. या प्रस्तावावर सरकारला विचार करण्यासाठी २४ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली. या मुदतीत केंद्र सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास पुन्हा बेमुदत बंद पुकारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
यासंदर्भात सोमवारी औरंगाबाद सराफा असोसिएशनची अग्रसेन भवन येथे बैठक घेण्यात आली. यात सर्व परिस्थितीचा विचार करून शहरातील दुकाने १३ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आज मंगळवारी दुपारनंतर ७० टक्के सराफा व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडली. संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी सांगितले की, अधिकृतरीत्या १३ रोजी दुकाने उघडण्यात येणार आहेत.