छत्रपती संभाजीनगर : मागील २० वर्षांमध्ये मराठी चित्रपटाला पुन्हा उभारी मिळाली आहे. दरवर्षी ५० ते ६० चित्रपट येतात. त्यांतील अनेक चित्रपट शहरी संस्कृतीपासून दूर असलेल्या ग्रामीण मातीतून निपजतात. त्यात होतकरू दिग्दर्शकाला वाटणारी तळमळ, खासगी व्यथा, सामाजिक पोटतिडीक अशा जाणिवांमधून बऱ्याच सिनेमांचा जन्म होतो. त्यातील काही चित्रपट तांत्रिकदृष्ट्या कच्चे असले, तरी आशयाला पक्के असल्यामुळे हृदयाला भिडतात, असे निरीक्षण ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांनी नोंदवले.
दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे एमजीएम संस्थेतील रुक्मिणी सभागृहात बुधवारी सायंकाळी उद्घाटन झाले. यावेळी परांजपे यांना पैठणीचा शेला, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि २ लाख रुपये असे स्वरूप असलेल्या पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले गेले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर सचिव विकास खारगे, महोत्सवाचे मानद अध्यक्ष तथा प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, फ्रिप्रेसी ज्यूरी चेअरपर्सन लतिका पाडगावकर, अभिनेत्री सीमा बिस्वास, एमजीएमचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, महोत्सव संचालक सुनील सुकथनकर, कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी आणि संयोजक नीलेश राऊत यांची उपस्थिती होती. परांजपे म्हणाल्या, मागील २० वर्षांमध्ये मराठी चित्रपटाला पुन्हा उभारी मिळाली आहे. होतकरू दिग्दर्शकाला वाटणारी तळमळ, खासगी व्यथा, सामाजिक पोटतिडीक अशा जाणिवांमधून बऱ्याच सिनेमांचा जन्म होतो. त्यातले काही तांत्रिकदृष्ट्या कच्चे असले, तरी आशयाला पक्के असल्यामुळे हृदयाला भिडतात.
सरकारी नोकरीला कंटाळून बाहेर पडले अन् उत्तम दिग्दर्शक, निर्माती बनलेदिल्लीमध्ये आठ वर्षे सरकारी नोकरीतील यंत्रणांना कंटाळून मुंबईत परतले. त्यानंतरच लेखिका, नाटककार, चित्रपट निर्माती, दिग्दर्शक बनल्याची जाहीर कबुली ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांनी दिली. नभोवाणी, दूरदर्शन व तेथून रंगभूमी आणि चित्रपट निर्माती, दिग्दर्शक अशा कारर्किदीचा चढता आलेखच त्यांनी मांडला. छत्रपती संभाजीनगरच्या चित्रपट महोत्सवाने पुण्या-मुंबईबाहेरही महोत्सव यशस्वी होऊ शकतात, हे दाखवून दिल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
दरवर्षी १०० कोटी रुपये अनुदानचित्रपट हे महत्त्वपूर्ण क्षेत्र असून भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सॉफ्ट पॉवर म्हणून सिनेमा काम करत असतो. राज्य शासन दरवर्षी मराठी सिनेमाला १०० कोटी रुपयांचे अनुदान देत आहे.- विकास खारगे, अपर मुख्य सचिव, मुख्यमंत्री कार्यालय
महोत्सव देशभरात पाेहोचलाहा एकमेव असा महोत्सव असेल ज्यामधे दिग्दर्शक आयोजकांच्या भूमिकेत आहेत. हा महोत्सव रसिक, प्रेक्षकांचे मनोरंजन करत त्यांना शिक्षित करत प्रेरणा देण्याचे काम करत आहे.- आशुतोष गोवारीकर, प्रसिद्ध दिग्दर्शक तथा महोत्सवाचे मानद अध्यक्ष
मानवतेचा प्रवास सांगण्याचा प्रयत्नया महोत्सवात अगोदर ज्युरी म्हणून सहभागी झालो होतो. आता महोत्सवाचा संचालक म्हणून काम करीत आहे. मानवतेच्या प्रवासाच्या गोष्टी सिनेमाच्या सहाय्याने सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे.- सुनील सुकथनकर, महोत्सव संचालक
महोत्सव देशपातळीवर पोहोचल्याचा अभिमानहे महोत्सवाचे दशकपूर्तीचे वर्ष आहे. महोत्सव या भागापुरताच मर्यादित न राहता देशपातळीवर पोहोचल्याचा अभिमान वाटतो.- चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सव कार्यकारी संचालक
विभागाची ओळखहा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आता मराठवाडा विभागाची ओळख बनला आहे. त्यातून या भागातील प्रतिभावंत कलाकारांना हक्काचे व्यासपीठही मिळत आहे.-नंदकिशोर कागलीवाल, अध्यक्ष, महोत्सव संयोजन समिती