कोल्हापुरी बंधाऱ्याचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: June 23, 2014 23:52 IST2014-06-23T23:52:12+5:302014-06-23T23:52:12+5:30
पाटोदा: तालुक्यातील दोन ठिकाणच्या कोल्हापुरी बंधाऱ्यास मंजुरी मिळाली आहे. यामुळे नागरिकांच्या मागणीला तीस वर्षानंतर यश आले आहे.

कोल्हापुरी बंधाऱ्याचा मार्ग मोकळा
पाटोदा: तालुक्यातील दोन ठिकाणच्या कोल्हापुरी बंधाऱ्यास मंजुरी मिळाली आहे. यामुळे नागरिकांच्या मागणीला तीस वर्षानंतर यश आले आहे. या बंधाऱ्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीचाही प्रश्न मार्गी लागणार आहे. या कामासाठी १४ कोटी ५६ लाख रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.
पाटोदा शहराजवळून जाणाऱ्या मांजरा नदीवर बंधारा उभारावा, अशी मागणी गेल्यातीस वर्षापासून करण्यात येत होती. या बंधाऱ्यामुळे पाटोदा शहरासह परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सध्या पाटोदा शहराला महासांगवी तलावातून पाणीपुरवठा केला जातो. या तलावाचीही पाणीपातळी घटल्याने सध्या पाटोदा येथे १५ दिवसाला पाणीपुरवठा होत आहे.
पाटोदा हे तालुक्याचे ठिकाण असून येथे महसूल विभागाचे उपविभागीय कार्यालय आहे. त्यामुळे येथे आष्टी, पाटोदा, शिरूरसह इतर ठिकाणच्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. यामुळे येथे हॉटेलसह इतरही व्यवसाय आहेत. पाटोदा येथे पाणीटंचाई असल्याने या व्यवसायीकांच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. तर, येथील महिला, ज्येष्ठ नागरिक, मुले यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. येथे पाण्याच दुर्भिक्ष असल्याने मांजरा नदीवर बंधारा बांधण्याची मागणी केली जात होती. याचा विचार करून शासनाने पाटोदा शहराजवळ कोल्हापुरी बंधारा बांधण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी ७४ लाख ९८ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली असल्याचे येथील लघुपाटबंधारे विभागातील प्रभारी उपअभियंता घोळवे यांनी सांगितले. या बंधाऱ्यामुळे पाटोदा परिसरातील घोलपवाडी, जाधववस्ती, काळुसे वस्ती, गर्जेवस्ती, धनगर जवळका, गितेवाडी येथील पाण्यासह शेतीचाही प्रश्न मार्गी लागणार आहे. या बंधाऱ्यामुळे या परिसरातील दोनशे हेक्टरवरील शेतीस फायदा होणार असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते विष्णूपंत घोलप, गणेश शेवाळे यांनी सांगितले. पाटोदा येथे कोल्हापुरी बंधारा करण्यासाठी गेल्या वीस वर्षापूर्वी सर्वेक्षण करण्यात आले होते. तेव्हापासून नागरिकांना बंधाऱ्याची आस होती. आता, या कामास मंजुरी मिळाल्याने नागरिकांची जीव भांड्यात पडला आहे.
पाटोदा तालुक्यातील पांचग्री येथेही मांजरा नदीवर कोल्हापुरी बंधारा बांधण्यास मंजुरी देण्यास आली आहे. या कामासाठी ७० लाख ६१ हजार ९०० रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या बंधाऱ्यामुळेही पाचंग्री, पाचेगाव, घुलेवस्ती येथील पिण्याच्या पाण्याचा व शेतीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या बंधाऱ्यांची उंची ६.०५ मीटर राहणार असून बंधाऱ्यास प्रत्त्येकी १८ दरवाजे बसविण्यात येणार आहेत.पुणे येथील लघुसिंचन विभागाचे सहाय्यक मुख्य अभियंता एस. के. चौधरी यांचे या बंधाऱ्याच्या मंजुरी संदर्भातील पत्र जिल्हा परिषदेस मिळाल्याचेही सूत्रांनी सांगितले.
या संदर्भात प्रभारी उपअभियंता घोलप म्हणाले, बंधाऱ्यास मंजुरी मिळाली असून इतर कामास आता लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. (वार्ताहर)