नूतन इमारतीचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: June 22, 2014 00:11 IST2014-06-21T23:36:39+5:302014-06-22T00:11:42+5:30
जालना : शहरातील महात्मा फुले मार्केटच्या नवीन संकुलाच्या कामासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यास विभागीय आयुक्तांकडून मंजुरी मिळाली.

नूतन इमारतीचा मार्ग मोकळा
जालना : शहरातील महात्मा फुले मार्केटच्या नवीन संकुलाच्या कामासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यास विभागीय आयुक्तांकडून मंजुरी मिळाली असून ही संचिका आता मंत्रालयात शासनाच्या विचाराधीन गेली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
सार्वजनिक खाजगी भागधारक या तत्त्वावर या संकुलाच्या नूतन इमारतीचे काम व्हावे, यासाठी जालना नगरपालिकेने एक आराखडा तयार केला होता. हा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे गेला. गेल्या अनेक दिवसांपासून या आराखड्याचा प्रस्ताव प्रलंबित होता. जुनी इमारत पाडण्यात आल्याने तेथील व्यापाऱ्यांना इतरत्र स्थलांतरित व्हावे लागले असून परिणामी, व्यापाऱ्यांना त्याचा आर्थिक फटकाही बसलेला आहे.
या ठिकाणी नवीन संकुल बनविण्याबाबत पालिकेला काही जणांच्या रोषालाही सामोरे जावे लागलेले आहे.
दरम्यान, बीओटी तत्त्वावर नूतन संकुलाचे काम व्हावे, अशा मागणीनेही जोर धरला होता.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वी संकुलाचे काम सार्वजनिक खाजगी भागधारक या तत्त्वावर व्हावे, यासाठीचा पालिकेने तयार केलेला प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला होता. आता विभागीय आयुक्तांकडून हा प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आला आहे. याबाबत मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांना विचारणा केली असता त्यांनी या प्रस्तावाची संचिका मंत्रालयात गेल्याच्या माहितीला दुजोरा दर्शविला. ही संचिका शासनाच्या विचाराधीन असून कोणत्या पद्धतीने काम व्हावे, यासाठीचे मार्गदर्शन मिळणार आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
नऊ वर्षांपासून प्रलंबित आहे प्रश्न
महात्मा फुले मार्केटमधील संकुलाची इमारत जीर्ण झाल्याने सुमारे नऊ वर्षांपूर्वी ही इमारत पाडण्यात आली होती. मात्र तेथे नवीन इमारत तयार करण्याच्या कामास अनेक अडथळे येत गेल्याने हे काम अद्यापही झालेले नाही.
पंधरा दिवसांपूर्वी आ. कैलास गोरंट्याल यांनी सदर काम तातडीने व्हावे, यासाठी आपण मंत्रालयीन स्तरावरून प्रयत्नशील असल्याचे सांगितले होेते. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांकडून नूतन संकुलाच्या कामाचा आराखडा मुंबई येथे मंत्रालयात पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.