घराचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा

By Admin | Updated: June 22, 2014 00:49 IST2014-06-22T00:44:33+5:302014-06-22T00:49:17+5:30

संजय जाधव , पैठण इंदिरा आवास योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील यादीत असणाऱ्या; परंतु इंदिरा आवास योजनेच्या मूळ प्रतीक्षा यादीत नाव नसणाऱ्या लाभार्थ्यांची सुधारित प्रतीक्षा यादी करण्याचे आदेश दिले आहेत

Fill the dream of a dream home | घराचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा

घराचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा

संजय जाधव , पैठण
इंदिरा आवास योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील यादीत असणाऱ्या; परंतु इंदिरा आवास योजनेच्या मूळ प्रतीक्षा यादीत नाव नसणाऱ्या लाभार्थ्यांची सुधारित प्रतीक्षा यादी करण्याचे आदेश जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी पंचायत समिती प्रशासनास दिले आहेत. या आदेशामुळे स्वत:च्या घराचे स्वप्न बाळगणाऱ्या शेकडो लाभार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
इंदिरा आवास योजनेंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यासाठी २५६२ घरकुलांचे उद्दिष्ट असून या घरकुलाच्या बांधकामासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासनाकडून १ लाख रुपयांचे अनुदान प्रदान करण्यात येते. २५६२ घरकुलांपैकी ८९८ घरकुलांना मागील वर्षी मंजुरी देण्यात आली आहे, तर यंदा १६७३ घरकुलांना जि.प. प्रशासनाने मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत जिल्हाभर घरकुलांची कामे मोठ्या संख्येने प्रगतिपथावर आहेत.
पैठण तालुक्यात सन २०१२-१३ साठी इंदिरा आवास योजनेंतर्गत ८१६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. यापैकी ६७१ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. ७ मंजूर घरकुलांना घर बांधण्यासाठी स्वत:ची जागा नसल्याने या लाभार्थ्यांचे अनुदान वितरित करण्यात आलेले नाही. ८१६ घरकुल लाभार्थ्यांपैकी ८०९ लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता, तर ७५१ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता देण्यात आला असल्याचे गटविकास अधिकारी उल्हास सोमवंशी यांनी सांगितले.
सन २०१३-१४ अंतर्गत ६३५ घरकुले मंजूर असून यापैकी १७९ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. यापैकी ६१८ लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला व ४८२ लाभार्थ्यांना अनुदानाचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आला आहे. यापैकी १७ घरकुलांना स्वत:ची जागा नसल्याने त्यांच्या जागेसाठी प्रस्ताव तयार करून पाठविण्यात आला आहे. इंदिरा आवास योजनेंतर्गत एकूण उद्दिष्टाच्या ६० टक्के घरकुले अनुसूचित जाती/जमाती व १५ टक्के अल्पसंख्याक लाभार्थींना मंजूर करण्यात येतात. या घरकुलाची मालकी लाभधारक कुटुंबातील महिला सदस्याच्या नावाने असते. हे घरकुल भाड्याने अथवा विकता येत नाही. घरासाठी अनुदानाचा बांधकाम सुरू करण्यासाठी ३५००० रुपये पहिला हप्ता, लेंटल लेव्हलपर्यंत काम झाल्यास दुसरा ३५००० रुपये व काम पूर्ण झाल्यावर २५००० रुपये असा शेवटचा हप्ता बँक खात्यात जमा करण्यात येतो.
घरकुलास जागा नसल्यास गावठाणमध्ये जागा द्या
घरकुल मंजूर झाले; परंतु घरकुल बांधण्यासाठी लाभधारकाकडे जागा उपलब्ध नसल्यास अशा लाभधारकास गावठाणमधून जागा उपलब्ध करून द्यावी, असे स्पष्ट निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. यासाठी तहसीलदारांकडे गटविकास अधिकाऱ्यांनी प्रस्ताव सादर करून तो मंजूर करून घ्यावा, असे या आदेशात म्हटले आहे. या आदेशामुळे स्वत:ची जागा नसलेल्या लाभार्थ्यांच्या घराचा प्रश्न सुटणार आहे.
असे असेल घरकुल
इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुलाचे चटई क्षेत्रफळ २६९ चौ. फूट असावे व घराची उंची कमीत कमी १० फूट असावी. घरासाठी शौचालय व निर्धूर चूल असावी. घरकुलामध्ये किमान २ खोल्या असाव्यात, असे बंधनकारक करण्यात आले आहे.
दारिद्र्यरेषेखालील यादीत नाव आहे; परंतु इंदिरा आवास योजनेच्या मूळ प्रतीक्षा यादीत नाव नसलेल्या बेघर असलेल्या लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी तयार करून ग्रामपंचायतने पंचायत समितीकडे तातडीने सादर करावी, असे आवाहन पं.स. सभापती विलास भुमरे, उपसभापती बाबासाहेब पवार व गटविकास अधिकारी उल्हास सोमवंशी यांनी केली आहे.
रमाई योजनेंतर्गत वस्तूंचे वाटप
रमाई योजनेंतर्गत ९८६ लाभार्थ्यांसाठी प्रत्येकी २ ब्लँकेट, २ चादर व १ सौर दिवा वाटपाकिरता पंचायत समितीकडे प्राप्त झाला आहे. या वस्तूंचे लवकरच वाटप करण्यात येणार असून लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतचे ओळखपत्र आणावे, असे आवाहन सभापती विलास भुमरे व गटविकास अधिकारी उल्हास सोमवंशी यांनी केले आहे.

Web Title: Fill the dream of a dream home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.