खताची साठेबाजी करणाऱ्या दुकानदाराचा परवाना निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 07:39 PM2020-06-23T19:39:54+5:302020-06-23T19:41:26+5:30

कृषिमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार गुणनियंत्रकाला सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय सचिव स्तरावरून घेण्यात येणार आहे.

Fertilizer hoarding shopkeeper's license suspended | खताची साठेबाजी करणाऱ्या दुकानदाराचा परवाना निलंबित

खताची साठेबाजी करणाऱ्या दुकानदाराचा परवाना निलंबित

googlenewsNext

औरंगाबाद : युरिया खताचा मोठ्या प्रमाणात साठा असतानाही शेतकऱ्यांना देण्यास नकार देणाऱ्या जाधववाडीतील नवभारत फर्टिलायझर्स दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी दिली. 

राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी रविवारी जाधववाडी येथील नवभारत फर्टिलायझर्स या खत विक्रेत्याकडे जादा दराने खत विक्री होत असल्याचा तसेच स्टॉक असतानाही  शेतकऱ्यांना  खत दिले जात नसल्याचा प्रकार स्टिंग आॅपरेशन करून उघडकीस आणला होता. त्यासाठी ते शेतकऱ्याचा  वेश धारण करून गेले होते. यावेळी कृषिमंत्र्यांनी थेट कृषी  सचिवांना फोन लावत कारवाईचे आदेश दिले. यानंतर जिल्हा कृषी अधिकारी सीताराम मोटे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांना बोलावून घेत पंचनामा करण्याचे आदेश दिले आणि गुणनियंत्रकाला सक्तीच्या रजेवार पाठविण्याचे आदेश विभागाच्या सचिवांना दिले.

यानुसार जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाने रविवारी रात्री उशिरा नवभारत फर्टिलायझर्स दुकानाचा परवाना निलंबित करण्याची कारवाई केली असल्याची माहिती गंजेवार यांनी दिली. तसेच निलंबनाच्या कारवाईनंतर परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी सुनावणीनंतर निर्णय घेण्यात येईल. तसेच दुकानदाराकडे असलेला स्टॉक कमी करण्याविषयी लवकरच निर्णय होणार असल्याचेही गंजेवार यांनी स्पष्ट केले. तसेच कृषिमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार गुणनियंत्रकाला सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय सचिव स्तरावरून घेण्यात येणार आहे. याविषयीचा अहवाल लवकरच राज्य शासनाकडे पाठविला जाईल, असेही गंजेवार यांनी स्पष्ट केले. 

शहरातील साठेबाजांची साखळी तोडा
जिल्ह्यातील तालुका, ग्रामीण भागातील दुकानदारांपर्यंत शहरातील तीन-चार मोठे दुकानदार रासायनिक खते पोहोचू देत नाहीत. खरीप हंगामाला सुुरुवात झाल्यापासून सतत याविषयी आवाज उठवीत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या खरीप पिकांच्या आढावा बैठकीतही शहरातील खताच्या साठेबाजीवर नियंत्रण मिळविण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, कृषी विभागातील अधिकारी आणि साठेबाजांची मिलीभगत असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ही शहरातील साठेबहाद्दरांची साखळी तोडणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी सभापती एल. जी. गायकवाड यांनी दिली. 

Web Title: Fertilizer hoarding shopkeeper's license suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.