फेलोशिपचा पेच विद्यापीठात कायम
By Admin | Updated: November 18, 2014 01:09 IST2014-11-18T01:00:35+5:302014-11-18T01:09:05+5:30
औरंगाबाद : मागील तीन- चार वर्षांपासून खंडित झालेली गोल्डन ज्युबिली फेलोशिप सुधारित स्वरूपात सुरू करण्याचा निर्णय झाला खरा;

फेलोशिपचा पेच विद्यापीठात कायम
औरंगाबाद : मागील तीन- चार वर्षांपासून खंडित झालेली गोल्डन ज्युबिली फेलोशिप सुधारित स्वरूपात सुरू करण्याचा निर्णय झाला खरा; पण मुहूर्तालाच ही फेलोशिप आरक्षणाच्या कचाट्यात सापडल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सर्व विभागांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त संशोधन करणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी गोल्डन ज्युबिली फेलोशिप सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला या फेलोशिपसाठी प्रती विभाग २ याप्रमाणे ४२ शैक्षणिक विभागांच्या एकूण ८४ संशोधक विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. दोन वर्षांसाठी दरमहा २ हजार रुपयांप्रमाणे ही फेलोशिप दिली जायची. तत्कालीन कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या कार्यकाळात सुरू झालेली ही फेलोशिप पुढे काही वर्षांनंतर बंद पडली.
अलीकडे ही फेलोशिप सुधारित स्वरूपात सुरू करण्यासाठी डॉ. आर.आर. देशमुख यांची समिती नेमली. व्यवस्थापन परिषदेने या समितीच्या शिफारसीनुसार गोल्डन ज्युबिली फेलोशिपऐवजी विद्यापीठ स्कॉलर्स शिष्यवृत्ती, असे नामकरण केले.
याशिवाय ही फेलोशिप एप्रिल २०१४ पासून लागू करण्यात आली असून, त्यासाठी विद्यार्थी संख्या व रकमेतही वाढ करण्यात आलेली आहे. सुधारित फेलोशिपमध्ये प्रती विभाग ४ याप्रमाणे ४२ विभागांतून १६८ संशोधक विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. दरमहा ६ हजार रुपयांप्रमाणे ती दोन वर्षांसाठी संशोधक विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. कारभारी काळे यांनी सर्व विभागांना पत्र देऊन विभागातील संशोधक विद्यार्थ्यांची या फेलोशिपसाठी निवड करून यादी पाठविण्याचे आवाहन केले होते. मात्र, संशोधक विद्यार्थ्यांची फेलोशिपसाठी निवड करताना डॉ. आर.आर. देशमुख समितीने काही निकष ठरवून दिले आहेत. त्यानुसार विभागातील संशोधक विद्यार्थ्यांची निवड ही गुणवत्तेवर करावी. २ विद्यार्थी खुल्या प्रवर्गातून, तर २ विद्यार्थी राखीव प्रवर्गातून निवडले जावेत. मात्र, राखीव प्रवर्गातून विद्यार्थ्यांची निवड कशी करावी, असा पेच विभागप्रमुखांसमोर निर्माण झाला आहे. काही विभागांच्या विद्यार्थ्यांनी आज डॉ. कारभारी काळे यांची भेट घेऊन हा तिढा सोडविण्यासाठी आग्रह धरला. तेव्हा त्यांनी पुन्हा सर्व विभागप्रमुखांना विद्यापीठ स्कॉलर्स शिष्यवृत्तीसाठी संशोधक विद्यार्थ्यांची निवड करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यासंदर्भात महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. कारभारी काळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, विद्यापीठ स्कॉलर्स शिष्यवृत्तीसाठी राखीव प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांची निवड करताना रोटेशन पद्धत अवलंबणेच सोयीस्कर राहील.
४त्यामुळे कोणत्याही प्रवर्गावर अन्याय होणार नाही. तशा सूचना सर्व विभागप्रमुखांना लवकरच दिल्या जातील.