अतिक्रमणांची भीती, वन विभाग सातारा-देवळाई परिसरात कंपाऊंड वॉल बांधणार
By साहेबराव हिवराळे | Updated: February 21, 2024 19:51 IST2024-02-21T19:51:20+5:302024-02-21T19:51:28+5:30
सातारा आणि देवळाई मनपा हद्दीत असल्याने खबरदारी

अतिक्रमणांची भीती, वन विभाग सातारा-देवळाई परिसरात कंपाऊंड वॉल बांधणार
छत्रपती संभाजीनगर : शहरीकरण झपाट्याने होत असल्याने सातारा कक्ष क्र. २८७, २८८, २८९ आणि देवळाई २८६ हे मनपा हद्दीत आहेत. वन विभागाने सातारा-देवळाई जमीन मूल्य वाढल्याने खबरदारीसाठी वनक्षेत्रात कुंपण घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दहा कोटींच्या रकमेस मान्यता मिळाली आहे.
शहरीकरणामुळे प्लॉटिंग आणि बांधकाम मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे अतिक्रमण होण्याचा धोका असल्याने वनक्षेत्राभोवती संरक्षक भिंत घालण्याची आवश्यकता असल्याने त्याविषयी शासनाकडे प्रस्ताव दाखल केला आहे. त्यानुसार सातारा व देवळाई येथील वनहद्दीच्या सभोवताली भिंत बांधण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. १५ कोटींच्या निधीच्या कामांना मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाने तांत्रिक सहमती दिल्यानंतर प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचे अधिकार देण्यात आलेले आहेत. वनक्षेत्राभोवती सोलापूर हायवे तसेच प्लॉटिंग वाढल्याने वन विभागाची आपल्या जमिनीबाबतची चिंता वाढली आहे. वन परिक्षेत्राच्या हद्दीत कुणीही घुसू नये व अतिक्रमण करू नये म्हणून वन विभागाने याविषयीचा प्रस्ताव पाठविला होता. वनक्षेत्राभोवती संरक्षक भिंत बांधकाम करण्यासाठी १०,६९,५८,०२९ रुपयांच्या रकमेला मान्यता देण्यात आलेली आहे. या वन क्षेत्रात भविष्यात कुणीही अतिक्रमण करता कामा नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
वनक्षेत्राच्या दृष्टीने मानव, वन्यजीव संघर्ष कमी होण्यासाठी उपायोजना हा देखील एक उद्देश यात आहे. याविषयी वनपरिक्षेत्र अधिकारी दादा तौर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या बांधकामाला मंजुरी आल्याचे सांगितले. हे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे.