‘रक्तविलगीकरण’ला ‘एफडीए’ची मान्यता
By Admin | Updated: June 8, 2014 00:56 IST2014-06-08T00:35:21+5:302014-06-08T00:56:26+5:30
उस्मानाबाद : दीड वर्षापासून केंद्रीय अन्न सुरक्षा व औषध प्रशासनाकडे धूळ खात पडलेल्या रक्तविलगीकरण केंद्रास मान्यता मिळाली आहे़

‘रक्तविलगीकरण’ला ‘एफडीए’ची मान्यता
उस्मानाबाद : दीड वर्षापासून केंद्रीय अन्न सुरक्षा व औषध प्रशासनाकडे धूळ खात पडलेल्या रक्तविलगीकरण केंद्रास मान्यता मिळाली आहे़ या मान्यतेमुळे जिल्हा रूग्णालयातील यंत्रणा कार्यान्वित होणार असून, प्लाझमासह प्लेटलेट, पीसीव्ही आदी जिल्हा रूग्णालयातच उपलब्ध होणार असल्याने रूग्णांची सोय होणार आहे़
उस्मानाबाद जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीत रक्तसंकलन केल्यानंतर तपासणी करून रूग्णांना देण्यात येत होते़ तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़अशोक धाकतोडे व रक्तपेढीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रक्तविलगीकरण केंद्र सुरू करण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले़ यासाठी स्वतंत्र इमारत उभी करण्यात आली असून, सेंन्ट्रीफ्यूज मशीन, प्लाझ्मा एक्सप्रेसर, प्लेटलेट अॅझिटेटर आदी आवश्यक त्या यंत्रणाही आणण्यात आल्या़ याचा अहवाल गेल्यानंतर दिल्ली येथील टीमने जिल्हा रूग्णालयातील रक्तविलगीकरण केंद्रातील सोयी-सुविधा, यंत्रणांची पाहणी केली़ मात्र, पाहणीसही वर्षाचा कालावधी लोटत आला तरी मंजुरी रखडली होती़ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाठपुराव्यानंतर एफडीएने (अन्न व औषध प्रशासन) प्रस्तावास मंजुरी देवून परवाना दिला आहे़ परवाना मिळाल्यामुळे जिल्हा रूग्णालयातील रक्तविलगीकरण केंद्र सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ येथील यंत्रणांची चाचणी सुरू असून, उर्वरित यंत्रणाही बसविण्यात येणार आहेत़ रक्तविलगीकरणामुळे जिल्ह्यात न मिळणारा प्लाझ्मा, प्लेटलेट, पीसीव्ही हे रूग्णांना मिळणार आहे़ त्यामुळे सोलापूर, बार्शीकडे होणारी रूग्णांची धावपळ व नातेवाईकांची हेळसांड थांबणार आहे़
लवकरच यंत्रणा कार्यान्वित
रक्तविलगीकरण केंद्रास दिल्ली येथील एफडीएकडून नुकताच परवाना मिळाला आहे़ रक्तपेढीतील यंत्रणांची चाचणी करण्यात येत आहे़ ही या चाचणीनंतर लवकरच रक्तविलगीकरण केंद्र सुरू करण्यात येणार असून, याचा रूग्णांना लाभ मिळणार असल्याचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ़ सचिन देशमुख यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
‘जीवन अमृत’ला प्रतिसाद
नव्याने सुरू झालेल्या जीवन अमृत योजनमुळे कोणत्याही रूग्णालयातील रूग्णांना रक्ताची गरज भासली तर रक्तपुरवठा करण्याची सोय करण्यात आली आहे़ टोल फ्री क्रमांक १०४ वर रूग्णांच्या नातेवाईकांनी फोन करून माहिती दिल्यानंतर त्यांना जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीसह इतर आवश्यक त्या ठिकाणाहून रक्त उपलब्ध करून देण्याची सोय करण्यात आली आहे़