पशुखाद्य महागले !
By Admin | Updated: August 6, 2015 00:08 IST2015-08-05T23:54:46+5:302015-08-06T00:08:32+5:30
बाळासाहेब जाधव , लातूर गेल्या चार वर्षांपासून पाऊसकाळ कमी झाला आहे. यंदा तर दुष्काळच आहे. पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जिल्ह्यावर असून, चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.

पशुखाद्य महागले !
बाळासाहेब जाधव , लातूर
गेल्या चार वर्षांपासून पाऊसकाळ कमी झाला आहे. यंदा तर दुष्काळच आहे. पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जिल्ह्यावर असून, चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. ज्वारीच्या कडब्याची पेंढी ५० रुपयाला, तर उसाच्या चार वाड्याची पेंढी ३५ रुपयाला विकली जात आहे. त्यामुळे पशुधन जगवावे कसे, असा प्रश्न पशुपालकांसमोर उभा टाकला आहे.
लातूर जिल्ह्यात लहान जनावरांची संख्या १ लाख ४४ हजार ९३२ आहे. तर मोठ्या जनावरांची संख्या ४ लाख ५५ हजार २१८ आहे. लहान-मोठे मिळून ६ लाख १५० पशुधन जिल्ह्यात आहे. सर्वसाधारणपणे लहान जनावरांना प्रतिदिन तीन किलो तर मोठ्या जनावरांना ६ किलो पशुखाद्य ग्राह्य धरले तर दिवसाला एकूण ३ हजार १६६ किलो खाद्य लागते. परंतु, पशुसंवर्धन विभागाकडे आणि शेतकऱ्यांकडे पशुखाद्यच उपलब्ध नाही. त्यामुळे शेजारच्या कर्नाटक राज्यातून आणि नांदेड जिल्ह्यातून वैरण मागविली जात आहे. जिल्ह्यात खाद्य उपलब्ध नसल्याने चढ्या दराने खाद्य उपलब्ध करावे लागत आहे. त्यातच जिल्ह्यात एकही चारा छावणी उभा राहिली नाही. पशुसंवर्धन विभागाने सहकारी संस्थांना चारा छावण्या उभा करण्यासाठी आवाहन केले. मात्र या आवाहनाला अद्याप तरी प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न बिकट झाला आहे. ज्वारीची एक पेंढी ५० रुपयाला, हायब्रीडची २५ रुपयाला, उसाच्या वाड्याची पेंढी ३५ रुपयाला तर हिरव्या मक्याची ४५ रुपयाला पेंढी आहे.
जिल्ह्यातील ६ लाख १५० पशुधन जगवायचे असेल, तर ३ कोटी २ लाख रुपये खर्च पशुपालकांना येतो. एक किलोची पेंढ ७५ रुपयाला तर शेकडा कडब्याची पेंढी ५ हजार रुपयाला सध्या खरेदी करावी लागत आहे. या चाऱ्याचा ढोबळ हिशेब लावला तर महिन्याला ३ कोटी २ लाख रुपयांच्या पुढे पशुधन जगविण्यासाठी खर्च करावा लागत आहे. त्यातच चारा छावण्या नाहीत. शासन व प्रशासनाची मदत नाही. त्यामुळे पशुपालकांसमोर मोठ्या अडचणी आल्या आहेत.
शेकड्याचा भाव ठरवून वैरण खरेदी केली जात असे. परंतु, आता मोठ्या प्रमाणात वैरणच उपलब्ध नाही. त्यामुळे दहा-पाच कडब्याच्या पेंढ्या खरेदी केल्या जातात. ज्वारीची एक पेंढी ५० रुपये या भावाने मुश्किलीने दहा-पाच पेंढ्या मिळत आहेत.
पशुधनाला जगविण्यासाठी दर दिवसाला ३१६६ किलो खाद्य लागते. महिन्याचा विचार केला तर ९४ हजार ९८३ किलो खाद्याची गरज आहे. लातूर तालुक्यासाठी १३ हजार ४४९, औसा १५ हजार २६४, निलंगा १५ हजार १३८, उदगीर ९ हजार ७६७, अहमदपूर १० हजार ९७२, रेणापूर ७ हजार ४९८, चाकूर ९ हजार १४१, शिरूर अनंतपाळ ४ हजार २५९, देवणी ४ हजार २३३, जळकोट ५ हजार २६१ असे एकूण ९४ हजार ९८३ किलो खाद्य दरमहिन्याला लागते. तर वर्षाला ११ लाख ३९ हजार ७७९ किलो खाद्य या पशुधनाला लागणार आहे. परंतु, जिल्ह्यात कोठेही चारा उपलब्ध नाही.