आई-वडिलांची भेट अर्धवट!
By Admin | Updated: June 12, 2017 00:20 IST2017-06-12T00:19:10+5:302017-06-12T00:20:36+5:30
धारुर : ‘‘आई, मी तुला भेटायला येतोय!’’, असे फोनवर बोलणे झाले. आई-वडिलांच्या भेटीसाठी आतुरतेने निघालेल्या सर्जेराव पवार यांच्यावर रस्त्यातच काळाने घाला घातला.

आई-वडिलांची भेट अर्धवट!
अनिल महाजन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धारुर : ‘‘आई, मी तुला भेटायला येतोय!’’, असे फोनवर बोलणे झाले. आई-वडिलांच्या भेटीसाठी आतुरतेने निघालेल्या सर्जेराव पवार यांच्यावर रस्त्यातच काळाने घाला घातला. सर्जेराव घरी येण्याऐवजी त्यांच्या मृत्यूची वार्ता कानावर धडकली. जन्मदात्या मातेने काळीज चिरून टाकील, असा हंबरडा फोडला. त्यामुळे वातावरण सुन्न झाले होते.
धारूर तालुक्यातील आसरडोह अंतर्गत येणाऱ्या वाडीवाडा तांडा येथील सर्जेराव लक्ष्मणराव पवार (३०) हे पुण्याला असतात. एका खाजगी कंपनीत ते नोकरीत आहेत. गेल्या वर्षी त्यांचा विवाह झाला. पत्नीही पुण्याच्या हडपसर भागात पोलीस शिपाई आहे. प्रत्येक महिन्या-दोन महिन्याला ते आई-वडिलांच्या भेटीसाठी गावाकडे येत असतात. रविवारीही ते आई-वडिलांच्या भेटीसाठी गावाकडे येत होते. गावाकडे निघण्यापूर्वी पत्नीला परत येण्याचा विश्वास देत व आईला घरी येत असल्याची खबर देऊन ते खाजगी बसमध्ये बसले. पहाटे साखरझोपेत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. आष्टीजवळ झालेल्या अपघातात ते ठार झाले. ही बातमी गावाकडे समजताच नातेवाईकांसह मित्रांनी घटनास्थळाकडे धाव घेतली, तर त्यांच्या घरी नातेवाईकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. रडण्याच्या आवाजाने परिसर सुन्न झाला होता.
शेतातील कामासाठी मदत
गावाकडे आल्यानंतर सर्जेराव पवार हे मशागतीसाठी मदत करायचे. रविवारीही तसे नियोजनहोते. दिवसभर काम करून ते रात्री पुन्हा परत जाणार होते; परंतु हे नियतीला मान्य नव्हते अन् अपघाताने त्यांचा मृत्यू झाला.