जमीन विकली म्हणून बापाचा खून
By Admin | Updated: April 1, 2015 01:04 IST2015-04-01T00:20:06+5:302015-04-01T01:04:41+5:30
पाचोड : सोमवारी मध्यरात्री मुलाने बापाला मारहाण करून त्यांचा खून केला.

जमीन विकली म्हणून बापाचा खून
पाचोड : तुम्ही संपूर्ण जमीन का विकली? आज तेवढी जमीन असती तर किती पैसे आले असते? मला असे काम करावे लागले नसते, असे म्हणत सोमवारी मध्यरात्री मुलाने बापाला काठीने बेदम मारहाण करून त्यांचा खून केला. ही धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील हिरापूर येथे घडली. या प्रकरणी पाचोड पालीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाप-लेकात सुरू असलेले भांडण सोडवायला गेलेल्या आई राधाबाई यांनाही मुलाने मारहाण केल्याने त्याही गंभीर जखमी झाल्या आहेत.
नभाजी दगडू लेंडे (६०) असे मयताचे नाव असून राजेंद्र नभाजी लेंडे असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, नभाजी लेंडे यांना दोन मुले आहेत. यातील राजेंद्र हा हिरापूरला, तर बंडू पंधरा वर्षांपासून आडूळ येथे राहतो. नभाजी हे हिरापूरलाच राजेंद्र सोबत राहत होते. सोमवारी ३० मार्च रोजी रात्री राजेंद्र व त्याचे वडील नभाजी यांच्यात जमीन का विकली म्हणून वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला गेल्याने राजेंद्रने वडील नभाजी यांना काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. जवळच असलेली आई भांडणात मध्यस्थी करण्यास गेली असता मुलाने तिलाही मारहाण केली.
दरम्यान, बाहेर येऊन तिने आरडाओरड केल्यावर भाऊसाहेब पठाडे व इतर गावकऱ्यांनी भांडण सोडवले. राजेंद्रला घराबाहेर आणले व आडूळला राहत असलेला मुलगा बंडू याला माहिती दिली. काठीने बेदम मारहाण झाल्यामुळे नभाजी हे घरात पडलेले होते. त्यांची प्रकृती गंभीर बनत चालली होती. याचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांना घरी बोलावण्यात आले.
डॉक्टरांनी तपासून त्यांना घाटीत दाखल करण्यास सांगितले; परंतु पहाटे दीड वाजता नभाजी लेंडे यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी हिरापूर गावात जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. शवविच्छेदन करण्यासाठी प्रेत प्राथमिक आरोग्य केंद्र आडूळ येथे आणण्यात आले. याप्रकरणी बंडू लेंडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजेंद्र लेंडे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि भगवान धबडगे, फौजदार संपत पवार करीत आहेत.