खरीप हंगामात शेतकऱ्यांचे ‘थांबा व वाट पाहा’ धोरण;बियाणांची फक्त ३ टक्केच विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 05:49 PM2019-06-07T17:49:06+5:302019-06-07T17:50:22+5:30
बी-बियाणे खरेदीसाठी धजेना शेतकरी
औरंगाबाद : खरीप हंगामाला येत्या दोन दिवसांत सुरुवात होत आहे. यंदा मान्सूनचे उशिरा आगमन होणार असे संकेत हवामान विभागाने दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांनीही ‘थांबा व वाट पाहा’ असे धोरण अवलंबले आहेत. यामुळे आजमितीपर्यंत जिल्ह्यात अवघे ३ टक्केच बियाणे विक्री झाले आहेत. यात मक्याचा समावेश अधिक आहे.
खरीप हंगामाला ७ जूनपासून सुरुवात होते. औरंगाबादेत कपाशी व मका हे दोन पिके खरीप हंगामात महत्त्वाची मानली जातात. बोंडअळीपासून संरक्षणासाठी यंदा ७ जूननंतरच बीटी बियाणे खरेदी करा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. त्याचा प्रचार व प्रसारही मोठ्या प्रमाणात झाला. त्यात यंदा मराठवाड्यात मान्सून उशिरा सुरूहोणार आहे, असे हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. यामुळे शेतकरी अजून बियाणे दुकानात खरेदीसाठी आले नाहीत. मात्र, जिल्ह्यात होलसेल विक्रेत्यांकडून किरकोळ विक्रेत्यांकडे बियाणांचा पुरवठा होत असून, कपाशीच्या ६० ते ६५ टक्के बियाणे व मक्याचे ७० ते ८० टक्के बियाणे किरकोळ विक्रेत्यांकडे पोहोचले आहे.
यासंदर्भात जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले की, कपाशीच्या किमतीत यंदा पाकीटमागे १० रुपये कमी होऊन ७३० रुपयास (४५० ग्रॅम) विकण्यात येणार आहे, तर मका बियाणाचे भाव मागील वर्षीप्रमाणे ८०० ते १३०० रुपये प्रति ४ किलो बॅग) विकण्यात येत आहे. जिल्ह्यात फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव व कन्नड या तालुक्यांत कपाशी व मका पीक जास्त क्षेत्रावर घेतले जाते. सिल्लोडमध्ये सोयाबीनचाही पेरा होतो. औरंगाबाद तालुका तसेच गंगापूर, वैजापूर, पैठण तालुक्यात जास्त क्षेत्रावर कपाशी व मका तर तुरळक क्षेत्रावर बाजरीची पेरणी केली जाते. गंगापूर, वैजापूर व पैठण येथील नदी काठावर उसाची लागवड केली जात असते. मात्र, पाण्याअभावी यंदा उसाचे क्षेत्र कमी करून त्याऐवजी कपाशी घ्यावी, असा विचार तेथील शेतकरी करीत आहे. यामुळे कपाशीच्या क्षेत्रात वाढीची शक्यता वाटत आहे. जिल्ह्यात १५ जूनपर्यंतच शेतकरी मूग व उडीदची पेरणी करतात, असा दरवर्षीचा अनुभव आहे. यंदा मान्सून उशिरा सक्रिय होणार असल्याने मूग, उडीदची पेरणी किती होते हे सांगणे सध्या कठीण असल्याचेही काळे यांनी नमूद केले.
मागील वर्षी उत्पादन कमी झाल्याचा फटका
मागील वर्षी कपाशीला सुरुवातीला ५००० रुपये क्विंटल भाव मिळाला होता. नंतर वाढ होऊन ६३०० रुपयांपर्यंत भाव येऊन ठेपला आहे. तसेच सुरुवातीला १४०० रुपये क्विंटलने विक्री झालेल्या मक्याला सध्या २१०० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. जेव्हा भाव चांगला मिळू लागला तेव्हा शेतकऱ्यांकडे कपाशी व मका शिल्लक नव्हता.
३ ते ४ इंच पाऊस पडल्यावरच पेरणी करा
राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक डॉ. सूर्यकांत पवार यांनी सांगितले की, यंदा मान्सून मराठवाड्यात उशिरा दाखल होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी ७५ ते १०० मि.मी. (३ ते ४ इंच) पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी.