सहा गावातील शेतकरी अनुदानापासून वंचित
By Admin | Updated: June 24, 2014 00:27 IST2014-06-24T00:27:20+5:302014-06-24T00:27:20+5:30
ईट : गारपीटग्रस्तांना शासनाने आचारसंहितेच्या कालावधीत नुकसानभरपाई जाहीर केली़

सहा गावातील शेतकरी अनुदानापासून वंचित
ईट : गारपीटग्रस्तांना शासनाने आचारसंहितेच्या कालावधीत नुकसानभरपाई जाहीर केली़ डीसीसी बँकेत याद्यानिहाय लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग केलेली असतानाही अद्यापपर्यंत ईट (ता़भूम) परिसरातील सहा गावातील शेतकऱ्यांना मदतीचा छदाम न मिळाल्याने संताप व्यक्त होत आहे़ डीसीसीचे अधिकारी कर्मचारी कमी असल्याचा कांगावा करीत असून, या सुलतानी संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे़
रबी हंगामामध्ये पिके हातातोंडाशी आलेली असताना अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले़ महसूल विभागाच्या वतीने पंचनामे झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असूनही विशेष बाब म्हणून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचे जाहीर करण्यात आले. सर्व शेतकऱ्यांना नुकसानीच्या पटीत रबी हंगामातील पीक पाहणीनुसार रक्कमही तहसील कार्यालयामार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे वर्ग करण्यात आली.
ईट शाखेंतर्गत असलेल्या गावांपैकी पांढरेवाडी, पखरुड, नागेवाडी, निपाणी, माळेवाडी, लांजेश्वर या सहा गावच्या शेतकऱ्यांना गारपिटीने झालेल्या नुकसानीचे अद्याप वाटप झाले नाही. याबाबत शाखाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, सरसकट अनुदानाचे वाटप सुरु आहे. काही गावच्या गारपिटीच्या रक्कमेचेही वाटप झाले आहे. मोठी सभासद संख्या, कमी कर्मचारी वर्ग व आॅनलाईन पद्धत असल्याने व त्याचा स्पीड कमी असल्याने या वाटपास उशीर होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, रबी हंगामातील पिकाचे गारपिटीने झालेले नुकसानभरपाई तात्काळ वाटप केल्यानंतर खरीप हंगामातील पेरणीस याचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे़ त्यामुळे बँकेने तात्काळ मदतीच्या निधीचे वाटप करावे, अशी मागणी उमाचीवाडी येथील उपसरपंच सुभाष शेळके यांनी केली आहे.