काळ्या आईची ओटी भरण्यासाठी शेतकरी सज्ज
By Admin | Updated: June 24, 2014 00:33 IST2014-06-24T00:33:42+5:302014-06-24T00:33:42+5:30
रमेश शिंदे , औसा ८ जूनला मृग नक्षत्राची सुरुवात झाली. त्यामुळे पाऊस आज पडेल, उद्या पडेल या अपेक्षेने शेतकरी दररोज वरुणराजाच्या हजेरीकडे डोळे लावून बसला आहे.

काळ्या आईची ओटी भरण्यासाठी शेतकरी सज्ज
रमेश शिंदे , औसा
८ जूनला मृग नक्षत्राची सुरुवात झाली. त्यामुळे पाऊस आज पडेल, उद्या पडेल या अपेक्षेने शेतकरी दररोज वरुणराजाच्या हजेरीकडे डोळे लावून बसला आहे. मृग नक्षत्राचे १५ दिवस उलटले, परंतु पाऊस मात्र आलाच नाही. सोमवारी आर्द्रा नक्षत्राची सुरुवात झाली. शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करून शेतकरी राजा मोठ्या पावसाची वाट पाहत काळ्या आईची ओटी भरण्यासाठी सज्ज झाला आहे.
औसा तालुका हा पावसाळी पाण्यावर अवलंबून आहे. १ लाख २१ हजार ७२० हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास ९ लाख क्षेत्रावर खरिपाची पेरणी होते. मागील चार-पाच वर्षांपासून खरीप हंगामासाठी वेळेवर पाऊस न पडणे, पेरण्या झाल्यानंतरही पावसात खंड पडणे, झालाच तर जास्तीचा पाऊस होणे आणि तोही पिके काढणीला आल्यानंतर, अशी परिस्थिती असते. त्यामुळे औसा तालुक्यातील शेतकरी आणि शेती व्यवसाय कोलमडून पडला आहे. किमान यावर्षी तरी चांगला पाऊस पडेल आणि मृग नक्षत्रात वेळेवर पेरण्या होतील. मागील चार-पाच वर्षांपासून झालेली शेती व्यवसायाची वाताहत थांबेल, अशी आशा शेतकरी बाळगून होता; परंतु या सर्वच अपेक्षावर मृग नक्षत्राने पाणी फेरले आहे. मृग नक्षत्रच कोरडे गेल्यामुळे आता शेतकऱ्यांची आशा आर्द्रा नक्षत्रावर आहे.
मागील वर्षी अर्ध्या तालुक्यात पेरणीसाठी वेळेवर पाऊस झाला होता. अर्ध्या तालुक्यात मात्र पावसाच्या विलंबामुळे पेरण्याही उशिराच झाल्या. मध्येच पावसाचा खंड पडल्यामुळे खरीप हंगाम म्हणावा तसा शेतकऱ्यांच्या हाती लागला नाही. त्यानंतर रबी हंगाम हाता-तोंडाशी आल्यानंतर गारपिटीने उद्ध्वस्त केला. त्यामुळे मागील वर्षी शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. तरीही शेतकरी काळ्या आईची ओटी भरण्यासाठी नव्या उत्साहाने सज्ज झाला आहे. परंतु, मृग नक्षत्र कोरडेच गेला असून, आर्द्रा नक्षत्रातही पावसाची काय परिस्थिती राहील, याच चिंतेत शेतकरी दिसून येत आहेत.
निसर्गाचा लहरीपणा...
निसर्ग लहरी बनला असून, आता शेती करणे नको वाटत आहे. कारण शेतामध्ये केलेला खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ लागत नाही. कधी कधी तर उत्पन्न कमी आणि खर्च अधिक, अशी अवस्था होत आहे. त्यामुळे या अल्पश: उत्पादनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे, अशी प्रतिक्रिया गणेश सूर्यवंशी, विकास कदम, राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्यांनी दिली आहे.