कर्जासाठी शेतकर्यांची पिळवणूक
By Admin | Updated: May 12, 2014 00:38 IST2014-05-12T00:25:18+5:302014-05-12T00:38:47+5:30
सोयगाव : शेतकर्यांना पीक कर्जासाठी मूल्यांकन व कर्ज बाँडवर सही देण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात आर्थिक अपेक्षेतून शेतकर्यांची अगोदर अडवणूक व नंतर पिळवणूक केली जात आहे.

कर्जासाठी शेतकर्यांची पिळवणूक
सोयगाव : शेतकर्यांना पीक कर्जासाठी मूल्यांकन व कर्ज बाँडवर सही देण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात आर्थिक अपेक्षेतून शेतकर्यांची अगोदर अडवणूक व नंतर पिळवणूक केली जात आहे. शेतकर्यांनी सावकारी कर्ज न घेता राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज घ्यावे यासाठी शासनाने पीक कर्जाची योजना सुरू केली आहे. शासनाच्या आदेशावरून बँका शेतकर्यांना पीक कर्ज देत आहेत. यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. यात शेतकर्यांना आपल्या जमिनीचे दुय्यम निबंधक कार्यालयाकडून मूल्यांकन करून घ्यावे लागते, तसेच पीक कर्जाच्या बाँडवर दुय्यम निबंधक यांची सही व शिक्का घ्यावा लागतो. सध्या पेरणीचे दिवस तोंडावर आलेले आहेत. त्यामुळे शेतकरी पीक कर्जाची कागदपत्रे गोळा करीत आहेत. सोयगावच्या दुय्यम निबंधक कार्यालयात शेतकर्यांना मूल्यांकन व सही, शिक्का घेण्यासाठी दोन-दोन दिवस चकरा माराव्या लागत आहेत. बाहेर गावहून येणार्या शेतकर्यांना दिवसभर बसवून ठेवले जात आहे. काहीतरी मिळेल या आर्थिक अपेक्षेतून शेतकर्यांची अशी अडवणूक केली जात आहे. यामुळे वैतागलेल्या शेतकर्यांनी चिरीमिरी दिल्यानंतर त्याचे काम केले जात आहे. सोयगाव येथे शासकीय कामासाठी येणार्या शेतकर्यांना यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. एकतर बस मिळत नाही. खराब रस्त्यामुळे जाण्या-येण्यास उशीर होतो. त्यात अशाप्रकारे शेतकर्यांना त्रास दिला जात असल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. शेतकर्याची अडवणूक व पिळवणूक थांबवून दुय्यम निबंधक कार्यालयात शेतकर्यांना पीक कर्जाची प्रक्रिया सुलभ करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे. याविषयी दुय्यम निबंधक संजय घाडगे यांना विचारणा केली असता सही व शिक्का मारण्यासाठी शंभर रुपये घेतले जातात; परंतु पावती दिली जात नाही. वेळेअभावी संध्याकाळी एकत्र पावती तयार केली जाते. आॅपरेटर एकच आहे, शिपाई नाही, दस्तऐवज करण्यासाठी प्राधान्य दिले जाते, त्यामुळे शेतकर्यांना बसावे लागते, असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)