शेततळ्याचे देयक रखडले
By Admin | Updated: July 22, 2014 00:17 IST2014-07-21T23:55:28+5:302014-07-22T00:17:31+5:30
मानवत : तालुका कृषी कार्यालयाकडून मंजूर झालेल्या शेततळ्याचे देयक मागील सहा महिन्यांपासूून रखडले आहे. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने शेतकऱ्यांना देयकाची रक्कम वेळेत मिळाली नाही.

शेततळ्याचे देयक रखडले
मानवत : तालुका कृषी कार्यालयाकडून मंजूर झालेल्या शेततळ्याचे देयक मागील सहा महिन्यांपासूून रखडले आहे. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने शेतकऱ्यांना देयकाची रक्कम वेळेत मिळाली नाही.
तालुक्यातील उक्कलगाव येथील कौशल्याबाई रोहिदास पिंपळे यांना पॉलिथीनचे शेततळे मंजूर झाले. शेततळे मंजूर झाल्यानंतर सदर शेतकऱ्याने १ लाख ८० हजार रुपये खर्च करून शेततळ्याचे खोदकाम केले. त्या खोदकामाचे देयक शेतकऱ्यास प्राप्त करण्यासाठी दीड महिना वाट पहावी लागली. त्यानंतर शेतकऱ्याने शेततळ्यात पॉलिथीन टाकले. शेततळ्याला ताराचे कुंंपन घेतले आणि याचे देयक तयार करून २० जानेवारी २०१४ रोजी तालुका कृषी कार्यालयात दाखल केले. परंतु नामफलक लावून शेततळ्याचा फोटो काढला नाही म्हणून त्यांना परत केले. २१ जानेवारी रोजी सदर शेतकऱ्याने कागदपत्रांची पूर्तता करून देयके मंजुरीसाठी तालुका कृषी कार्यालयात दाखल केले. शेततळ्याचा लाभधारक महिला असल्याने त्यांचा मुलगा रामकिशन पिंपळे यांनी सातत्याने तालुका कृषी कार्यालयात आपल्या शेततळ्याच्या देयकासाठी चकरा मारल्या. परंतु त्यांचे देयके अद्याप मंजूर झाले नाही. ५ लाख ५६ हजारांची मजुंरी असलेल्या शेततळ्यापैकी १ लाख ८० हजार एवढी रक्कम शेतकऱ्यास मिळाली. परंतु उर्वरित रकमेसाठी शेतकऱ्याला तालुका कृषी कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत. तालुका कृषी अधिकारी एस. ए. चंद्रावाड यांनाही याबाबत भेट घेतली. परंतु शेतकऱ्याच्या देयकाबाबत तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांनी सातत्याने टोलवा -टोलवीच केली.
कृषी सहाय्यक देशपांडे यांना विचारले असता ते म्हणाले, १ लाख ८० हजार रुपयांचे बिल काढल्यानंतर त्या मोजमापपुस्तिकेचा संदर्भ घेऊन उर्वरित बिल काढावे लागते. या शेततळ्याची मूळ मोजमापपुस्तिका जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातून लवकर प्राप्त न झाल्याने बिलाची कागदपत्रे पुढे पाठविणे शक्य झाले नाही. मार्च महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण झाली असून निधीच्या प्राप्ततेनुसार शेतकऱ्यांचे देयक अदा करण्यात येईल. (वार्ताहर)
शेततळ्याचा निकष नव्हताच
तालुका कृषी कार्यालयातून वाटप करण्यात आलेल्या तुषार संचासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने शेततळे असणे बंधनकारक केले होते. परंतु जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून आलेल्या पत्रामध्ये सदरील तुषारसंच मागासवर्गीय, अत्यल्प, अल्प, महिला व इतर शेतकऱ्यांच्या शेतावर उन्हाळी भुईमूग पिकासाठी सिंचन करण्यासाठी होती. परंतु तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आपल्या मनानेच शेततळ्याचा निकष लावला. जिल्हा अधीक्षक कार्यालयातून आलेल्या पत्रात योजना राबविण्यासाठी टिप्पणी दिली होती. या टिप्पणीत ही योजना उन्हाळी भुईमूग पिकासाठी वापरण्यात यावी, शेतकऱ्यांचे गट तयार करण्यात यावेत, शेतकऱ्यांच्या गटासाठी लाभ देण्यात यावा, गटाव्यतिरिक्त लाभ देण्यात येऊ नये व लाभधारकाचा प्राधान्यक्रम वरीलप्रमाणे असावे, असे स्पष्ट सांगितले असताना तालुका कृषी अधिकारी एस. एस. चंद्रवाड यांनी मनमानी पद्धतीने कारभार केला.
मंजुरीनंतर संच मिळेना
तालुका कृषी कार्यालयातून मंजूर झालेल्या तुषार संचाच्या यादीत कौशल्याबाई रोहिदास पिंपळे यांचे नाव होते. परंतु त्यांना तुषार संच मिळाला नाही. याबाबत कौशल्याबाई पिंपळे यांनी तहसीलदारांकडे लेखी तक्रार करून आमच्या हक्काचा लाभ मिळवून देण्याची विनंती केली आहे.