पैठण (औरंगाबाद ) : शेतात वास्तव्य असलेल्या एका शेतकरी दांपत्यासह एका महिलेस बेदम मारहाण करुन चार ते पाच दरोडेखोरांनी ४० हजारांचा ऐवज लुटून नेल्याची घटना औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडूळ शिवारात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेत शेतकऱ्यासह दोन महिला जखमी झाल्या असून याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झालेल्यांमध्ये शेतकरी वामन साहेबराव पाचे, लंकाबाई वामन पाचे, अंजनाबाई कसबे (७५, रा.पिंपळगाव जि. जालना) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर सध्या आडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सांगितले की, आडूळ येथील शेतकरी वामन साहेबराव पाचे (५०) हे गावापासून काही अंतरावर औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाजवळील गट नं ३६ मध्ये असलेल्या शेतावर कुटुंबासह वास्तव्यास आहेत. एका खोलीत त्यांचा मुलगा व सून तर दुसऱ्या खोलीत पाचे यांच्यास पती आणि सासू हे तिघे राहतात.
गुरुवारी (दि. ११) रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास चार ते पाच दरोडेखोरांनी अगोदर मुलाच्या खोलीची बाहेरुन कडी लावून घेतली. यानंतर वामन पाचे यांच्या खोलीत दरोडेखोर शिरले. त्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेही ओरडण्याच्या आवाजाने पत्नी लंकाबाई व अंजनाबाई कसबे यांना जाग आली. दरोडेखोरांनी त्यांनाही दांड्याने मारहाण केली. तसेच रोख रक्कम व काही सोन्या, चांदीचे दागिने असा एकूण ४० हजाराचा ऐवज घेऊन पोबारा केला.
दरम्यान, दरोडेखोरांनी दरवाजाची कडी लावून तेथून पळ काढला. यानंतर शेतकऱ्याचा मुलगा कल्याण याने फोनवर गावात माहिती कळविली. गावातील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी तिघांना तातडीने आडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे सपोनि. अभिजित मोरे, पोउनि. प्रदीप एकसिंगे, सहायक फौजदार कल्याण राठोड, रवींद्र क्षिरसागर, तात्यासाहेब गोपालघरे, रामदास राख आदी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
शुक्रवारी सकाळी प्रक्षिक्षणार्थी पोलीस उपाधिक्षक जगदीश पांडे, गुन्हे शाखेचे पोनि. सुभाष भुजंग, पोउनि. भगतसिंग दुल्हत, विक्रम देशमुख, संजय तांदळे, सय्यद झिया, नवनाथ कोल्हे, गणेश गांगवे आदींनी घटनास्थळी भेट दिली. तसेच श्वान पथकासह ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले. श्वान पथकाने आडूळ गावापर्यंत माग काढला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील शेतामध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अधिक तपास पाचोड पोलीस करीत आहेत.