शेतकर्यांची थट्टा !
By Admin | Updated: May 10, 2014 18:43 IST2014-05-10T18:41:54+5:302014-05-10T18:43:41+5:30
उस्मानाबाद : पाण्याची बचत व्हावी, पर्यायाने सिंचनाखालील क्षेत्र वाढावे या उद्देशाने सूक्ष्म सिंचन पद्धतीवर भर दिला जात आहे.

शेतकर्यांची थट्टा !
उस्मानाबाद : पाण्याची बचत व्हावी, पर्यायाने सिंचनाखालील क्षेत्र वाढावे या उद्देशाने सूक्ष्म सिंचन पद्धतीवर भर दिला जात आहे. ठिबक, तुषार या सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त वापर व्हावा, यासाठी शासन स्तरावर अनुदानही दिले जात आहे. त्यामुळे सिंचनाच्या या पद्धतींचा अवलंब करणार्या शेतकर्यांची संख्या वर्षागणिक वाढत आहे. असे असतानाच दुसरीकडे शासनाकडून शेतकर्यांना प्रोत्साहन मिळण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम होताना दिसून येत आहे. २०११-१२ आणि २०१२-१३ या आर्थिक वर्षातील लाभार्थी शेतकर्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही. तब्बल १४ कोटी रुपये शासनाकडे अडकले आहेत. राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियानाच्या माध्यमातून शेतकर्यांना अनुदान तत्त्वावर ठिबक, तुषार संच पुरविले जातात. या योजनेचा अधिकाधिक शेतकर्यांनी लाभ घ्यावा, यासाठी हे अनुदान दिले जात आहे. ही योजना शेतकर्यांच्या दृष्टिकोनातून चांगली असली तरी वेळेवर अनुदान उपलब्ध होत नसल्याने लाभार्थी शेतकरी चांगेलच अडचणीत सापडले आहेत. २०११-१२ या आर्थिक वर्षामध्ये १ हजार ४३७ शेतकर्यांनी अनुदानासाठी आॅनलाईन प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर संबंधित शेतकर्यांच्या प्रस्तावांना मंजुरीही मिळाली. विशेष म्हणजे यापैकी सर्वच्या सर्व शेतकर्यांनी आपापल्या शेतात ठिबक, तुषार संचही बसविले. त्यानंतर अनुदानाची मागणी केली. मात्र तीन वर्ष लोटले तरी या शेतकर्यांना अनुदानाचा एक छदामही मिळालेला नाही. शेतकर्यांकडून वारंवार पाठपुरावा केला जात आहे. मात्र अधीक्षक कृषी कार्यालयाकडूनही ‘वाट बघा’ असा सल्ला दिला जात आहे. उपरोक्त लाभार्थी शेतकर्यांच्या अनुदानापोटी ३ कोटी ३५ लाख ८२ हजार रुपये इतकी रक्कम गरजेची आहे. पाण्याचा प्रश्न लक्षात घेवून २०१२-१३ मध्ये या योजनेकडे शेतकर्यांचा अधिक कल वाढला. थोडे थोडके नव्हे तर चारपटीने लाभार्थी वाढले. लाभार्थी शेतकर्यांचा आकडा ६ हजार २३ वर जावून ठेपला. या माध्यमातून सुमारे ५ हजार ४५८.२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले. या शेतकर्यांना अनुदानापोटी १७ कोटी ९३ लाख १२ हजार इतकी रक्कम देणे अपेक्षित आहे. आज अखेर केवळ ७ कोटी २६ लाख रुपये उपलब्ध झाले आहेत. त्यानुसार ते वितरितही केले. मात्र आणखी ५० टक्क्यावर शेतकरी अनुदानाकडे डोळे लावून बसले आहेत. ३ हजार ६०० शेतकर्यांसाठी १० कोटी ६६ लाख रुपये लागणार आहेत. ही रक्कम शासनाकडून अद्याप मिळालेली नाही. दोन वर्ष लोटली तरी अनुदान मिळत नसल्याने लाभार्र्थी शेतकर्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी) पत्रावर पत्र सूक्ष्म सिंचन अनुदानाचे तब्बल १४ कोटी रुपये शासनाकडे अडकले असल्यामुळे शेतकर्यांचा या योजनेकडील कल कमी होऊ लागला आहे. ही बाब लक्षात घेऊन अधीक्षक कृषी कार्यालयाकडून थकित १४ कोटी रुपयांसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा सुरु असल्याचे सूत्रांकडून सांगितले. यासाठी वेळोवेळी स्मरण पत्र पाठविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. उस्मानाबाद आघाडीवर राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियानांतर्गत २०१२-१३ या वर्षात उस्मानाबाद तालुक्यातील १ हजार ५८६ शेतकर्यांनी ठिबक आणि तुषार संच बसविले. त्याचप्रमाणे परंडा तालुक्यातील ९००, कळंब तालुक्यातील ९०३, तुळजापूर ७५९, उमरगा ५२९, भूम ५६९, लोहारा ४२१ आणि वाशी तालुक्यातील ३५४ शेतकर्यांनी सदरील संच बसविले आहेत. या माध्यमातून किमान ५ हजार ४५८ हेक्टर क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आल्याचे कृषी विभागाने सांगितले.