‘अन्न सुरक्षे’तून शेतकऱ्यांना धान्य
By Admin | Updated: August 18, 2015 00:44 IST2015-08-18T00:44:27+5:302015-08-18T00:44:27+5:30
लातूर : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर आता शेतकऱ्यांनाही अल्प दरात गहू व तांदळाचे वितरण सुरु करण्यात आले असून,

‘अन्न सुरक्षे’तून शेतकऱ्यांना धान्य
लातूर : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर आता शेतकऱ्यांनाही अल्प दरात गहू व तांदळाचे वितरण सुरु करण्यात आले असून, ३३५ गहू तर २२२ मेट्रीक टन तांदळाचे वितरण लातूर जिल्ह्यात करण्यात आले आहे़ ९४ हजार ६६२ शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रेशन धान्य दुकानांमार्फत तांदूळ, गहू दिला जात आहे़ स्वातंत्र्यदिनापासून या उपक्रमाला प्रारंभ झाला आहे़
गेल्या तीन-चार वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाले आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ नापिकीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणातही वाढ होत आहे़ या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने मराठवाड्यात ८ आणि विदर्भातील ६ अशा एकूण १४ जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना धान्य देण्यास प्रारंभ केला आहे़ दारिद्र्यरेषेवरील केसरी शिधापत्रिका लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या दराबरोबरच धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे़ लातूर जिल्ह्यात ९४ हजार ६६२ श्ेतकरी आहेत़ त्यांच्याकडे हेच कार्ड आहे़ त्यानुसार ३ रुपये किलो तांदूळ आणि २ रुपये किलो दराने गहू प्रतीमहा प्रती व्यक्ती ५ किलो धान्य देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे़ जिल्ह्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानात या योजनेला प्रारंभ झाला असून, शासनाकडून लातूर जिल्ह्यासाठी ३३५ मेट्रीक टन गहू आणि २२२ मेट्रीक टन तांदूळ प्राप्त झाला असून, त्याचे वितरणही करण्यात आले आहे़
जिल्ह्यात असलेल्या १३८० स्वस्त धान्य दुकानांतून शेतकऱ्यांनाही अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात येत आहे. पर्जन्यमान कमी झाल्याने शेतकरी अडचणीत सापडल्याने हा उपक्रम शासनाने सुरू केला असल्याचे प्रशासनाने सांगितले. (प्रतिनिधी)
अन्न सुरक्षा योजनेत शेतकऱ्यांची संख्या ९४ हजार ६६२ असून, या शेतकऱ्यांच्या कार्डवर कुटुंबातील सदस्य संख्या ५ लाख ३७ हजार ६४३ आहे़ त्यांंना नियमानुसार ३ रुपये किलो दराने तांदूळ व २ रुपये किलो दराने गहू दिला जात आहे़ प्रति व्यक्ती ५ किलो या प्रमाणे हे धान्य वाटपाला स्वातंत्र्यदिनापासून प्रारंभ झाला आहे़ प्रातिनिधीक स्वरुपात महापूर येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते धान्याचे वाटप करण्यात आले आहे़ यावेळी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, सरपंच सुमन आलोने यांची उपस्थिती होती़
लातूर जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांची संख्या १३८० असून, या सर्व दुकानातंर्गत चावडी वाचन करुन लाभार्थ्यांना धान्य वितरण केले जात आहे़ आता नव्याने शेतकऱ्यांनाही अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात येत असून, दक्षता समितीच्या सदस्यांसमोर चावडी वाचन केले जाणार आहे़ शिवाय, दर सहा महिन्याला रेशन कार्ड धारकांची पडताळणी करावी. खरे लाभार्थी वंचित राहू नयेत म्हणून रेशन कार्डची पडताळणी आवश्यक आहे. तिही दक्षता समितीच्या सदस्यांसमोर पडताळणी होणे गरजेचे असल्याचे अॅड. महेश ढवळे म्हणाले.