‘एमपीएससी’ परीक्षेत शेतकऱ्यांच्या मुलांचा झेंडा

By Admin | Updated: March 16, 2015 00:48 IST2015-03-16T00:39:15+5:302015-03-16T00:48:39+5:30

उस्मानाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे़

Farmers' flag hoisting in 'MPSC' examination | ‘एमपीएससी’ परीक्षेत शेतकऱ्यांच्या मुलांचा झेंडा

‘एमपीएससी’ परीक्षेत शेतकऱ्यांच्या मुलांचा झेंडा

 
उस्मानाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे़ या परीक्षेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनी यशाचा झेंडा रोवला आहे़ मुख्यालयातील चार पोलीस कर्मचाऱ्यांसह तालुक्यातील बेंबळी, जागजी येथील युवकांचा यात समावेश आहे़ उस्मानाबाद शहरातील एक युवकही पास झाल्याचे वृत्त आहे़
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा नुकताच निकाल लागला आहे़ यात तालुक्यातील बेंबळी येथील शेतकरी विष्णू खापरे यांचा मुलगा धनाजी उर्फ रवी याने घरची आर्थिक परिस्थिती बिकट असताना आई-वडिलांसह दोन्ही भावंडांच्या मदतीने या परीक्षेत मोठे यश संपादित केले आहे़ बेंबळी येथील रवी खापरे याने गावातच दहावीपर्यंत शिक्षण घेतले़ रवीने अकरावी-बारावीच्या शैक्षणिक वर्षात शहरातील खासगी दवाखान्यात कम्पाऊंडर म्हणून काम केले़ काम करीत बारावीची परीक्षा देणाऱ्या रवीने तब्बल ८७ टक्के गुण मिळविले़ त्यानंतर बार्शी येथे त्याने डी़एड़्चे शिक्षण पूर्ण केले़ डीएड् झाल्यानंतर परत उस्मानाबादेत येवून त्याने पुन्हा खासगी दवाखान्यात नोकरी सुरू केली़ त्यावेळी बी़ए़ला अ‍ॅडमिशन घेतले़ तो डीएड उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने सीईटी अभ्यासासाठी शहरातील खासगी क्लासेसमध्येही प्रवेश घेवून अभ्यास सुरू केला़ मात्र, सीईटी परीक्षा घेणे बंद झाले होते़ त्यानंतर हताश न होता रवीने मोठा भाऊ नितीन व तानाजी या दोघांच्या मार्गदर्शनाखाली एमपीएससीची तयारी सुरू केली़ पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २०१३ मध्ये एमपीएससीमार्फत पोलीस उपनिरीक्षक पदाची पूर्व परीक्षा दिली़ पूर्वपरीक्षेत यश मिळविल्यानंतर त्याने डिसेंबर २०१३ मध्ये मुख्य परीक्षा दिली़ मुख्य परीक्षेत त्याने ३४० पैकी २२७ गुण मिळविले़ यानंतर त्याने डिसेंबर २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या मुलाखतीतही चांगले गुण संपादित केले़ या परीक्षेचा अंतीम निकाल १३ मार्च रोजी लागला असून, खुल्या गटातील १८३ जागांमध्ये तो ४६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे़ विशेष म्हणजे एमपीएससीसाठी कोणताही क्लास न लावता स्वत:च सातत्यपूर्ण सर्वांगीण अभ्यास केल्याने हे यश मिळाल्याचे रवी याने सांगितले़ दिवसातील १३ ते १४ तासाचा अभ्यास केला़ आई-वडिल, भावंडांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, मदत व प्रसंगी मित्रांचे सहकार्य यामुळे आपल्याला हे यश मिळाल्याचेही तो म्हणाला़
उस्मानाबाद येथे सन २०१३ मध्ये पोलीस भरती झालेला गणेश त्रिंबक राऊत (रा़ कानडीमाळी ताक़ेज जि़बीड) हाही शेतकरी कुटुंबातील युवक़ पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असताना त्याने एमपीएससीची तयारी केली़ अथक परिश्रम आणि कामानंतर मिळणाऱ्या वेळेत केलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे गणेश राऊत याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ तर मुख्यालयातील कस्पटे, नवले व घोडके हे तीन कर्मचारीही फौजदार परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत़ उस्मानाबाद शहरातीलच कापसे नामक एक युवकही या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे़ तर तालुक्यातील जागजी येथील शेतकरी जनार्धन कस्पटे यांचा मुलगा रविंद्र कस्पटे यांनीही या परीक्षेत यश संपादीत केले आहे़ गुणवंतांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Farmers' flag hoisting in 'MPSC' examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.