वैजापुरात मकाच्या पैशांसाठी शेतकऱ्यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:07 IST2021-02-06T04:07:32+5:302021-02-06T04:07:32+5:30
वैजापूर : शासकीय मका खरेदी केंद्रावर मका देऊनही सात महिन्यांपासून पैसे मिळाले नाहीत. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर ...

वैजापुरात मकाच्या पैशांसाठी शेतकऱ्यांचे उपोषण
वैजापूर : शासकीय मका खरेदी केंद्रावर मका देऊनही सात महिन्यांपासून पैसे मिळाले नाहीत. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले. विशेष म्हणजे, या शेतकऱ्यांचा मका शासनापर्यंत पोहोचलेला नसून तो शासकीय गोडाऊनमधून गायब झाला आहे. हे प्रकरण सध्या तालुक्यात चांगलेच गाजत आहे. उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना तहसीलदार राहुल गायकवाड यांनी १० फेब्रुवारीपर्यंत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले.
वैजापूर येथील भरड धान्य खरेदी केंद्रांवर लाॅट एंट्री न झाल्यामुळे १० शेतकऱ्यांचे मका पेमेंट रखडले होते. या शेतकऱ्यांचा ३४३.५० क्विंटल मका परत करण्याचे आदेश शासनाने दिले. मात्र, सात महिन्यांपासून संबंधित शेतकऱ्यांना पेमेंट तर नाहीच पण मकाही परत मिळाला नाही. सदर शेतकऱ्यांचा मका गोडाऊनमधून गायब झाल्याचे समोर येताच एकच खळबळ उडाली. हे प्रकरण लोकमतने चव्हाट्यावर आणल्यानंतर तहसीलदारांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी सदर दहा संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले. या आंदोलनात निवृत्ती निकम, हिराबाई निकम, शेषराव निकम, संभाजी शिंदे, रवींद्र पाटणे, शांताबाई निकम, वसंत गायकवाड, अंजनाबाई गायकवाड, लक्ष्मण सोनवणे, कविता शिंदे हे दहा शेतकरी सहभागी झाले होते.
फोटो कॅप्शन : मकाचे पैसे न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते.