शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे

By Admin | Updated: June 24, 2014 00:32 IST2014-06-24T00:32:20+5:302014-06-24T00:32:20+5:30

उस्मानाबाद : सलग तीन वर्षाचा दुष्काऴ़़ भर उन्हाळ्यातील अवकाळी पावसाचे तांडव़़़ आणि आता पावसाने फिरविलेली पाठ ! यामुळे जिल्ह्यावर यंदाही भीषण दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे़

Farmer's eyes are in the sky | शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे

शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे

उस्मानाबाद : सलग तीन वर्षाचा दुष्काऴ़़ भर उन्हाळ्यातील अवकाळी पावसाचे तांडव़़़ आणि आता पावसाने फिरविलेली पाठ ! यामुळे जिल्ह्यावर यंदाही भीषण दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे़ शेतीमशागतीची कामे पूर्ण केलेल्या बळीराजाच्या नजरा आभाळाकडे लागल्या असून, पावसाअभावी कोणीच तिफणीवर हात ठेवलेला नाही़ खते, बी-बियाणांचे भाव वाढले असून, पावसाअभावी खरेदीकडे अनेकांनी दुर्लक्ष केले आहे़ परिणामी बाजारापेठेतील व्यवहारही मंदावल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात जवळपास चार लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी होते़ यात वाशी तालुक्यातील ५४ गावापैकी ३० गावे ही खरीप हंगामाची म्हणून ओळखली जातात. उमरगा तालुक्यात खरीपाचे एकूण ७२ हजार २०० हेक्टर, कळंब तालुक्यात जवळपास ७० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरिपाचा पेरा केला जातो़ तुळजापूर तालुक्यात ८७ हजार हेक्टर तर उस्मानाबाद तालुक्यात ७३५०० वर खरिपाची पेरणी केली जाते़ परंडा तालुक्यात सरासरी १८ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावरील खरीपाच्या पेरण्या ठप्प असून, भूम, लोहारा तालुक्यातही अशीच परिस्थिती आहे़ एकेकाळी भुईमूग पिकासाठी प्रसिध्द असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उसापाठोपाठ, सोयाबीन, उडीद, मूग, कापूस आदी पिकांच्या पेऱ्यावर भर दिला आहे़ सलग तीन वर्षाचा दुष्काळ आणि यंदा रबीत झालेली गारपीट यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे़ प्रारंभी हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून घेतली़ कृषी विभागाने घरगुती बियाणे वापरण्यावर भर दिल्याने अनेकांनी घरगुती बियाणेही पेरणीसाठी तयार करून ठेवली आहेत़ गतवर्षीपेक्षा खताचे भाव वाढले असले तरी पावसाअभावी कृषीकेंद्रात केवळ भावाची विचारणा करणाऱ्यांची संख्या दिसून येत आहे़ गत आठवड्यात तुळजापूर व उमरगा तालुक्यातील काही भागातच पाऊस झाला़ मृग नक्षत्र कोरडेठाक गेले असून, रविवारपासून सुरू झालेल्या आर्द्रा नक्षत्रावर शेतकऱ्यांच्या आशा कायम आहेत़ आठ-दहा दिवसात अपेक्षित पाऊस झाला नाही तर यंदाही भीषण दुष्काळाचा सामना जिल्हावासियांना करावा लागणार असून, शेतकऱ्यांची पूर्णत:
आर्थिक कोंडी होण्याची भिती व्यक्त होत आहे़ (प्रतिनिधी)
केवळ ४ टक्के पाऊस
हवामान खात्याच्या अंदाजानुसार प्रतिवर्षी ७ जून पासून पावसास सुरूवात होणे अपेक्षित आहे़ मात्र, मान्सूनचे आगमन झाल्यानंतर मृग नक्षत्र कोरडेठाक गेले आहे़ रविवारपासून आर्द्रा नक्षत्रास प्रारंभ झाला आहे़ पावसाळा सुरू होवून निम्मा महिना लोटला तरी जिल्ह्यात केवळ ४़२९ टक्के पाऊस झाला आहे़ उस्मानाबाद तालुक्यात ३५़५ मिमी, तुळजापूर तालुक्यात ३४़१ मिमी, उमरगा-२५़८ मिमी, लोहारा-३६़४ मिमी, भूम- २७़६ मिमी, कळंब- २८़३ मिमी, परंडा- ४५ मिमी तर वाशी तालुक्यात ३४ मिमी पाऊस झाल्याची नोंद शासनदफ्तरी आहे़
असे निघणार नक्षत्र
यंदाच्या पावसाळ्यात सुरू होणारे नक्षत्र व त्याचे वाहन पुढील प्रमाणे राहणार आहे़ ८ जून रोजी मृग (हत्ती), २२ जून रोजी आर्द्रा (मोर), ६ जुलै रोजी पुर्नवसू (गाढव), २० जुलै पुष्य (मेंढा), ३ आॅगस्ट रोजी आश्लेषा (उंदीर), १६ आॅगस्ट रोजी माघ (कोल्हा), ३० आॅगस्ट रोजी पूर्वा (मोर), १३ सप्टेंबर रोजी उत्तरा (घोडा), २७ सप्टेंबर रोजी हस्त (बेडूक), १० आॅक्टोबर रोजी चित्रा (म्हैस) तर २४ आॅक्टोबर रोजी शेवटचे स्वाती हे नक्षत्र निघणार असून, याचे वाहन घोडा असल्याचे सांगण्यात येते़

Web Title: Farmer's eyes are in the sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.