अवकाळी पावसाने शेतकरी कर्जबाजारी
By Admin | Updated: May 13, 2014 01:07 IST2014-05-12T23:48:10+5:302014-05-13T01:07:38+5:30
जळकोट : तालुक्यातील शेतकरी यंदा पूर्ण उन्हाळ्यात अवकाळी पावसासह, गारपीट, वादळी वारा यामुळे पूर्णत: हैराण झाला.

अवकाळी पावसाने शेतकरी कर्जबाजारी
जळकोट : तालुक्यातील शेतकरी यंदा पूर्ण उन्हाळ्यात अवकाळी पावसासह, गारपीट, वादळी वारा यामुळे पूर्णत: हैराण झाला असून पुढील खरिप हंगामात जमिनीला अवकाळी पावसाचा फटका बसणार असल्याने शेतकरी कर्जाच्या छायेत अडकणार असल्याची भीती व्यक्त करत आहे. तालुक्यात उन्हाळा चालू झाल्यापासून वादळ वारा, अवकाळी पाऊस, गारपीटांनी हजेरी लावली. दिवसभर उन्हाचा तडाखा त्यानंतर सायंकाळी वादळी वारे, अवकाळी पाऊस यामुळे रब्बी पिके घेतलेल्या पिकांवर नांगर फिरुन शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यावर शासनाने शेतकर्यांला मदतीपासून वंचित ठेवले. पूर्वीच कर्जबाजारी झालेला शेतकरी पुन्हा कर्जाचा डोंगर वाढून कर्जबाजारी झाला. येणार्या खरिप हंगामात शेतीची मशागत करून पेरणी करावे या हेतूने उभा टाकावा असे वाटू लागले होते. परंतु अवकाळी पाऊस आणि वादळी वारे शेतकर्यांचा पाठलाग काही सोडत नसल्याचे दिसून येत आहे. शेतकरी या संकटाला आधीच घाबरुन गेला असता हवामान खातेही शेतकर्यांच्या छातीवर पुन्हा वजन टाकत यावर्षी पावसाळा हा कमी तथा मध्यम स्वरुपाचा असल्याचे सांगत आहे. त्यामुळे रब्बी पिके अवकाळी पावसाने नेली आता खरीप पिकांवर तर काही तरी करून डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होईल या आशेने बसलेल्या शेतकर्यांच्या जखमेवर आधीच शासनाने अनुदान न देता मीठ टाकले आहे. पुन्हा निसर्ग मीठ टाकेल का अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहे.जळकोट येथील पंचागकर्ते राजकुमार जोशी यांनी सांगितले की, यावर्षी शेतीचे उत्पन्नात घट होणार असून, पाणी यावर्षी कमी पडले, काही ठिकाणी तुरळक पाणीटंचाई भासणार आहे. यंदा जून अखेर चांगल्या प्रमाणात पाऊस पडेल. जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होणार असून आॅगस्टमध्ये पाऊस समाधानकारक राहील. त्यानंतर काही ठिकाणी पावसाचा जोर राहील तर काही ठिकाणी कोरडे राहील असा अंदाज व्यक्त करत यावर्षी पावसाळा संमिश्र राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)