गारपिटीत नुकसान झालेले शेतकरी वंचित

By Admin | Updated: May 20, 2014 01:08 IST2014-05-20T00:27:05+5:302014-05-20T01:08:35+5:30

एकदरा: माजलगाव तालुक्यातील बहुतांश गावातील शेतकर्‍यांचे मार्च दरम्यान झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसात मोठे आर्थिक नुकसान झाले.

Farmers damaged by hail storms deprived | गारपिटीत नुकसान झालेले शेतकरी वंचित

गारपिटीत नुकसान झालेले शेतकरी वंचित

एकदरा: माजलगाव तालुक्यातील बहुतांश गावातील शेतकर्‍यांचे मार्च दरम्यान झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसात मोठे आर्थिक नुकसान झाले. मात्र या नुकसानीचे ना पंचनामे झाले ना मदत मिळाली. शासनाने दुबार पंचनामे करुन आर्थिक मदत करावी, अशी मागणी जदीदजवळा, एकदरा येथील शेतकर्‍यांनी केली आहे. मागील तीन वर्षांपासून दुष्काळाच्या संकटात सापडलेला शेतकरी यावर्षी कसाबसा उभा राहिला होता. रबीची पिके चांगली आली होती. मात्र अचानक गारपिटीचे संकट शेतकर्‍यांवर ओढावले आणि हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने ओढावून नेला. या संकटातून सावरण्यासाठी शासन थोडीफार आर्थिक मदत करील, या आशेवर माजलगाव तालुक्यातील शेतकरी होता. मात्र एकदरा, जदीदजवळा येथील शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामेच शासनाने केले नाहीत, असा आरोप शेतकर्‍यांकडून होत आहे. शासनाने लावलेल्या जाचक अटींमुळे अनेक शेतकर्‍यांचे ४० टक्केपर्यंत नुकसान होऊन देखील मदत यादीत नाव आले नाही. यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळाली नाही. आतापर्यंत बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी ९८ कोटी रुपयांची उपलब्धता झाली आहे. आलेला निधी अत्यंत कमी असल्याने शेतकर्‍यांनी दुबार पंचनामे करुन ४० टक्के नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातून जोर धरू लागली आहे. जदीदजवळा शिवारात गहू, हरबरा, ज्वारी व फळबाग या पिकांचे मोठे क्षेत्र आहे. येथील शेतकर्‍यांचा उदरनिर्वाह निव्वळ शेतीवरच अवलंबून आहे. अशा स्थितीत अस्मानी संकटाने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. गारपिटीनंतर तलाठी, ग्रामसेवक यांच्यामार्फत पंचनामे तर केले मात्र पंचनामे केल्यानंतर लाभार्थी यादीत कोणाचीच नावे आली नसल्याचे येथील शेतकरी विष्णू खरात यांनी सांगितले. ४० टक्के नुकसान झाले काय? आणि ५० टक्के नुकसान झाले काय? शेवटी शेतकर्‍यांचे नुकसान तर झालेलच आहे. काळ्या पडलेल्या गहू व ज्वारीला कोण विकत घेणार? असा सवाल एकदरा येथील शेतकरी नितीन बडे यांनी उपस्थित केला आहे. (वार्ताहर)

Web Title: Farmers damaged by hail storms deprived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.