दहेगाव बंगाला परिसरातील शेतकरी वळले हुरडा व्यवसायाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:10 IST2021-02-05T04:10:14+5:302021-02-05T04:10:14+5:30
‘जास्त थंडी, तितकी जास्त मागणी व त्या प्रमाणात जास्त उत्पन्न’ असे या व्यवसायाचे समीकरण आहे. पण यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे ...

दहेगाव बंगाला परिसरातील शेतकरी वळले हुरडा व्यवसायाकडे
‘जास्त थंडी, तितकी जास्त मागणी व त्या प्रमाणात जास्त उत्पन्न’ असे या व्यवसायाचे समीकरण आहे. पण यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे पाहिजे तशी थंडी नसल्याने मागील काही वर्षांच्या तुलनेत हुरड्याचे भाव कमी झाले आहेत. सुरती हुरड्याचा सध्याचा बाजारभाव अंदाजे १३० रुपये किलो आहे. या महामार्गावर दहेगाव बंगला ते गंगापूर फाट्याच्या दुतर्फा शेतकरी हुरडा विकताना दिसतात.
नरसापूरचे शेतकरी अण्णासाहेब शिंदे यांनी या धंद्यातील संधी हेरून हुरडा व्यवसायामध्ये मोठी भरारी घेतल्याचे दिसते. शिंदे हे स्वतः उत्पादक असून सध्या ते रोज सातशे ते आठशे किलो हुरडा महाराष्ट्राच्या विविध भागांत पोहोचवितात. यासाठी ते स्थानिक शेतकऱ्यांकडूनही हुरडा खरेदी करतात. या दिवसात ठिकठिकाणी ॲग्रो टुरिझमद्वारे हुरडा पार्ट्यांचे आयोजन केले जाते. यातील बऱ्याच ठिकाणी शिंदे यांच्या हुरड्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यांच्याकडून दोन प्रकारांत हुरड्याची निर्यात होते. एक, जागेवर तयार करून थेट विक्रीसाठी बनवलेला व दुसरा, ॲग्रो टुरिझमसाठी कणसांसहित पाठविला जाणारा हुरडा.
पदमपूर येथील राहुल जाधव यांनी हुरड्यासाठी दुसऱ्या शेतकऱ्यांचे गट विकसित केले असून औरंगाबाद शहरासह पुण्यालाही ते हुरडा पाठवितात. पुण्याचे त्यांचे नातेवाईक अमित मरकड यांनी ‘घरपोहोच हुरडा’ ही संकल्पना राबविली व तिला अल्पावधीतच खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याने अनेकांना पुण्यासारख्या ठिकाणी थेट शेतकऱ्यांकडून अत्यल्प दरात घरपोहोच हुरडा मिळत आहे.
येथील गोड हुरड्यामुळे खवय्यांची सुट्ट्यांमधील परिसरातील लगबग लक्षात घेऊन शामिर शेख या शेतकऱ्याने ढोरेगाव येथे स्वतःचे ‘शिवना ॲग्रो टुरिझम’ थाटले असून, त्यांच्याकडे शिवना तीरावर निसर्गरम्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात हुरडा पार्ट्यांचे आयोजन केले जाते.
ज्वारीचे पीक, त्यावर होणारा खर्च व मिळणारे अत्यल्प उत्पन्न या तुलनेत कमी कालावधीत अधिक नफा बळिराजाला हुरडा व्यवसायातून मिळताना दिसतो. त्यामुळे परिसरात हा व्यवसाय एका मोठ्या उद्योगाच्या रूपाने विकसित होत आहे. यामध्ये कोणीही अडत किंवा व्यापारी नसून स्वतः शेतकरी उत्पादक व स्वतः शेतकरीच विक्रेते असल्याने शेतकऱ्यांना याचा अधिक फायदा होत आहे. शंभरच्या आसपास शेतकरी कुटुंबांना यामुळे आधार मिळाला असून, अनेक महिलांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे.
नेहमीचीच उदासीन शासन व्यवस्था, सततचा दुष्काळ, लॉकडाऊनमुळे उद्भवलेले आर्थिक संकट, बेमोसमी पाऊस व त्यानंतरच्या ढगाळ वातावरणामुळे शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे; पण अशा बिकट परिस्थितीतही न डगमगता आपल्या पारंपरिक व्यवसायाला ‘लोकल टू ग्लोबल’ करून येथील शेतकऱ्यांनी आदर्श घालून दिला आहे.
कोट........
शेतकऱ्यांनी निसर्ग व शासनावर अवलंबून न राहता शेतीपूरक जोडधंदे उभे करून उद्योजकतेच्या दिशेने पाऊल टाकले पाहिजे. भविष्यात स्वतःचा ॲग्रो टुरिझम व शेतीपूरक उत्पादनाचा पॅकिंग उद्योग उभा करण्याचा माझा मानस आहे.
- अण्णासाहेब शिंदे, हुरडा उत्पादक व निर्यातदार.
कोट........
येथील हुरडा येथेच निसर्गाच्या सान्निध्यात खाण्याची खवय्यांची गरज ओळखून आम्ही स्वतः हुरडा उत्पादनाबरोबरच हुरडा पार्टीही देतो. यामुळे आमच्यासह स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. याच धर्तीवर भविष्यात विविध शेती उत्पादने ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ या संकल्पनेवर औद्योगिक परिसरात घरपोहोच देणार आहोत.
- शामिर शेख, हुरडा उत्पादक शेतकरी.
फाेटो आहे.