मृगाच्या ‘हत्ती’ कडे शेतकऱ्यांचे लक्ष
By Admin | Updated: June 8, 2014 00:54 IST2014-06-08T00:50:43+5:302014-06-08T00:54:45+5:30
यशवंत परांडकर, नांदेड रोहिणी नक्षत्रात भरपूर पाऊस पडेल आणि मृग नक्षत्राला आधार मिळेल, असे वाटले होते. पण तुरळक प्रमाणात पाऊस पाडून रोहिणी नक्षत्र आले तसे निघून गेले. आता सर्व मदार मृग नक्षत्रावर आहे.
मृगाच्या ‘हत्ती’ कडे शेतकऱ्यांचे लक्ष
यशवंत परांडकर, नांदेड
रोहिणी नक्षत्रात भरपूर पाऊस पडेल आणि मृग नक्षत्राला आधार मिळेल, असे वाटले होते. पण तुरळक प्रमाणात पाऊस पाडून रोहिणी नक्षत्र आले तसे निघून गेले. आता सर्व मदार मृग नक्षत्रावर आहे.
मृग नक्षत्र हे शेतकऱ्यांचे हक्काचे नक्षत्र असून या नक्षत्रात पाऊस पडल्यास ते पिकांना वरदान ठरणारा असतो. मृगाचे वाहन ‘हत्ती’ असून या नक्षत्रात मोठ्या पावसाची आशा आहे. दरवर्षी शेतकरी रोहिणी नक्षत्राच्या पावसाला गृहीत धरत नाही, पण मृगावर तो पूर्णपणे विसंबून असतो. या नक्षत्राच्या भरवशावर शेतकऱ्यांनी महागामोलाची बियाणे विकत घेऊन ठेवली आहेत. यावर्षी मृग नक्षत्रात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. रोहिणी नक्षत्राचा ‘उंदीर’ म्हणावा तसा पाऊस न पाडता निघून गेला असला तरी मृगाचा ‘हत्ती’ मात्र धो-धो पाऊस पाडेल आणि पाण्यात बसून राहील, अशी आशा आहे.
यावर्षी पीक चांगले यावे म्हणून काही शेतकऱ्यांनी साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेला बियाणे खरेदी केले आहेत. हवामानाचा अंदाज लक्षात घेता यावर्षी चांगला पाऊस पडेल व बळीराजाच्या परिश्रमाचे ‘मोल’ होईल, असे म्हटले तर वावगे ठरू नये, एवढेच. मृग नक्षत्र ८ जून रोजी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी प्रारंभ होणार असून २१ रोजी संपणार आहे. या नक्षत्राचे वाहन ‘हत्ती’ आहे. रोहिणी नक्षत्राच्या ‘उंदरा’ ने म्हणावा तसा पाऊस पाडला नसला तरी मृग नक्षत्राचा ‘हत्ती’ पेरणीयोग्य पाऊस पाडेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता यावर्षी पर्जन्यवृष्टी अनुकूल असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, यंदा जिल्ह्याचे तापमान ४४ अंशांपर्यंत गेले़ त्यामुळे उन्हाची काहिली सर्वांना असह्य झाली़ अशावेळी पावसाची प्रतीक्षा लागली आहे़
आजपासून मृग नक्षत्रास प्रारंभ
रोहिणी नक्षत्राचा उंदीर पाऊस न पाडताच गेला निघून
हवामान विभागाचा यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज
शेतकऱ्यांनी केली पेरणीची पूर्वतयारी
मृग नक्षत्राची साथ मिळण्याची शेतकऱ्यांना आशा