पिक कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्याने बँकेतच केले विष प्राशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 16:48 IST2018-08-04T16:47:20+5:302018-08-04T16:48:42+5:30
: पिक कर्जाच्या मंजुरीस दिरंगाई होत असल्याने पैठण तालुक्यातील एका शेतकऱ्याने बॅंकेतच विषारी द्रव्य प्राशन केल्याची घटना आज दुपारी १२ वाजता घडली.

पिक कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्याने बँकेतच केले विष प्राशन
औरंगाबाद : पिक कर्जाच्या मंजुरीस दिरंगाई होत असल्याने पैठण तालुक्यातील एका शेतकऱ्याने बॅंकेतच विषारी द्रव्य प्राशन केल्याची घटना आज दुपारी १२ वाजता घडली. मधुकर सुदाम आहेर (४८ ) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्यावर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचार सुरु आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मधुकर आहेर यांनी विहामाडंवा येथील सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पिक कर्जासाठी अर्ज केला होता. त्याच्या मंजुरीस दिरंगाई होत होती. यावर माहिती घेण्यासाठी ते शाखा व्यवस्थापकाकडे गेले असता त्यांच्या कडून मिळालेल्या उत्तराने त्यांचे समाधान झाले नाही. यानंतर त्यांनी रागाच्या भरात आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास बँकेतच विषारी द्रव्य प्राशन केले. बँकेतील नागरिकांनी त्यांना विहामाडंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता त्यांना पाचोड येथील ग्रामीण रूणालयात उपचारासाठी दाखल करावे असे सांगण्यात आले. पाचोड येथील रुग्णालयात आहेर यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबाद येथील घाटी रूणालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, आहेर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी बँकेत एकच गर्दी केली. घटनेची नोंद पाचोड पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून बँकेत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलीस करत आहेत.
जास्त कर्जाची मागणी होती
आहेर यांनी यापूर्वी बॅकेकडून कर्जे घेतले होते. त्याची ९ हजार बाकी त्यांच्याकडे होती. याबाबत ४ हजार रुपये भरून तडजोड करून त्यांना २० हजाराचे कर्ज देण्यात येणार होते. मात्र त्यांची जास्त रक्कमेची मागणी होती. त्यांना याबाबत चर्चेसाठी आज बोलाविण्यात आले होते. मात्र येथे येताच त्यांनी हा प्रकार केला.
- राम पूनित मिश्रा, बॅंकेचे मॅनेजर