बियाणे कंपन्यांविरुद्ध शेतकऱ्यांचा संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:26 IST2017-07-21T00:23:56+5:302017-07-21T00:26:45+5:30
परभणी : खरीप हंगामात शेतकऱ्यांनी काही कंपन्यांकडून घेतलेल्या सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी बियाणांची पेरणीनंतर उगवण झाली

बियाणे कंपन्यांविरुद्ध शेतकऱ्यांचा संताप
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : खरीप हंगामात शेतकऱ्यांनी काही कंपन्यांकडून घेतलेल्या सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी बियाणांची पेरणीनंतर उगवण झाली नसल्याच्या २३८ शेतकऱ्यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेत कृषी विभागाच्या झालेल्या बैठकीत तक्रारी केल्या. त्यानंतर या प्रकरणी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी व पशूसंवर्धन सभापती श्रीनिवास मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
खरीप हंगामाच्या प्रारंभी जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मूग, कापूस, ज्वारी आदींचे काही कंपन्यांचे बियाणे खरेदी केले होते. त्यातील काही मोजक्या कंपन्याकडून फसवणूक झाली व पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी या शेतकऱ्यांनी कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी, जि.प.कृषी सभापती यांच्याकडे केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कृषी सभापती श्रीनिवास मुंडे यांनी गुरुवारी विविध कंपन्यांचे अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, पंचायत समित्यांचे कृषी अधिकारी, गुणनियंत्रण अधिकारी आदींची बैठक बोलावली होती. या बैठकीस प्रगतशील शेतकरी कांतराव देशमुख यांचीही उपस्थिती होती. जि.प.च्या सभागृहात झालेल्या या बैठकीत सोनपेठ तालुक्यातील १७१, पाथरी तालुक्यातील ६२ व परभणी तालुक्यातील ५ अशा एकूण २३८ शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदविल्या. त्यामध्ये पाथरी तालुक्यातील डाकू पिंपरी येथील शेतकऱ्यांनी मल्लिका २०७ कापूस बियाणांची उगवण झाली नसल्याची तक्रार केली. या अनुषंगाने कृषी अधिकारी स्मिता कुपटेकर यांनी या तक्रारी कृषी अधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या असून त्याचा अहवाल अद्याप मिळाला नसल्याचे सांगितले. सोनपेठ तालुक्यातील १७१ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. त्यामध्ये नरवाडी येथील शेतकऱ्यांनी कापूस बियाणे २०७ व तृणनाशक फवारणीचे औषध या अनुषंगाने तक्रारी केल्या. या अनुषंगाने केलेल्या चौकशीचा अहवाल अद्याप अप्राप्त असून अहवालानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले. गंगाखेड तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनीही मल्लिका २०७ बियाणे व तृणनाशक फवारणी औषधी संदर्भात तक्रार केली. तालुक्यातील तीन तक्रारी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या. परंतु, कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात आले. परभणी तालुक्यातील ५ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. या तक्रारीत सोयाबीन उगवले नसल्याचे व तृणनाशक औषधी याची नोंद आहे. यावेळी शेतकऱ्यांनी कंपन्यांनी फसवणूक केल्याचेही सांगितले. या संदर्भातील तक्रारी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आल्या असून अधिकारी उपलब्ध न झाल्याने त्याचे निरसन झाले नाही, असे सांगण्यात आले. मानवत तालुक्यातून एक तक्रार प्राप्त झाली असून याबाबतचा अहवाल कृषी अधीक्षकांकडे पाठविण्यात आला असल्याचे कृषी अधिकारी एस.टी.तमशेटे यांनी सांगितले. जिंतूर, पूर्णा, पालम, सेलू या तालुक्यातून एकही तक्रार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी माणिक कदम यांनी कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फोन बंद असतात, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्यास अडचण येत असल्याचे सांगितले. त्यावर सर्वच कृषी अधिकाऱ्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक चालू ठेवावेत व ते शेतकऱ्यांना उपलब्ध करुन द्यावेत, असे आवाहन सभापती मुंडे यांनी केले. त्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक जाहीर केले. यावेळी कृषीभूषण कांतराव देशमुख यांनी सभापती श्रीनिवास मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासंदर्भात घेतलेल्या पुढाकाराबाबत त्यांचे अभिनंदन केले.