पाचोड : रस्ताकामामुळे शेतात पाणी साचले, याबाबत महसूल प्रशासनाकडे तक्रार केली असता मंडळ अधिकारी व तलाठी पाहणी करण्याकरिता आले. मात्र त्यांनी शेतकऱ्यालाच फैलावर घेतल्याने उद्विग्न झालेल्या शेतकऱ्याने त्यांच्यासमोरच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील खादगाव येथे मंगळवारी दुपारी अडीच वाजता घडली. संजय शेषराव काेहकडे (वय ४५, रा. खादगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, खादगाव ते खर्डा रस्त्याचे काम सुरू आहे; पण पाऊस पडल्यामुळे हे काम बंद झाले. या रस्त्यालगत संजय कोहकडे यांचे शेत असून त्यांच्या शेताच्या दोन्ही बाजूंनी खोदकाम झालेले आहे. यामुळे पावसाचे पाणी कोहकडे यांच्या शेतात साचून पिकांचे नुकसान झाले. याबाबतची तक्रार संजय कोहकडे यांनी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी पंचनाम्यासाठी बालानगर मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे आणि तलाठी लक्ष्मीकांत गोजरे हे घटनास्थळी आले होते. संजय कोहकडे यांनी आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांनाच धारेवर धरले. एकीकडे शेतपिकाचे नुकसान झाले व दुसरीकडे अधिकारी आपल्यालाच खरे- खोटे सुनावत आहे, यामुळे उद्विग्न झालेले संजय कोहकडे यांनी अधिकाऱ्यांसमोरच पळत जाऊन शेजारील विहिरीत उडी घेतली. यावेळी काही ग्रामस्थांनीही धावत जाऊन त्यांना वाचविण्यासाठी विहिरीत उड्या टाकल्या. कोहकडे यांना बेशुद्धावस्थेत विहिरीबाहेर काढून तत्काळ पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी प्रकाश साबळे यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण गावात संताप आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मयत कोहकडे यांचेकडे पाच ते सहा एकर शेती असून घरची परिस्थिती जेमतेम आहे. रस्ताकामामुळे त्यांच्या शेतात पाणी साचून पिकांचे मोठे नुकसान झाले. याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली, मात्र अधिकाऱ्यांनी त्यांनाच खडसावले यामुळे त्यांनी टाेकाचा निर्णय घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकारया घटनेनंतर संतप्त झालेल्या संजय कोहकडे यांचे कुटुंबीय व नातेवाईकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. मात्र पाचोड पोलिसांनी त्यांची समजूत काढून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यानंतर सायंकाळी ७ वाजता मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चर्चा करीत असतानाच घटनाखादगाव येथील आप्पासाहेब जगन्नाथ डाके व इतर शेतकऱ्यांनी पैठण तहसील कार्यालयात शेत जमिनीचे पाणी रस्त्याने जाण्यासाठी मोकळे करण्यासाठी तक्रार केली होती. त्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाच्या आदेशावरुन मी स्वतः खादगाव येथे गेले होते. तेथे शेतकऱ्यांशी चर्चा करीत असताना अचानक संजय कोहकडे या शेतकऱ्याने जवळच असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मी स्वतः पैठणच्या तहसीलदार ज्योती पवार व पाचोड पोलिस स्टेशनला दिली आहे.-शुभांगी शिंदे, मंडळ अधिकारी.