कुटुंबनियोजनाची मोफत शस्त्रक्रिया जिवावर बेतली !

By Admin | Updated: May 29, 2014 00:33 IST2014-05-29T00:13:32+5:302014-05-29T00:33:49+5:30

लातूर : कुटुंबनियोजनाची बिनटाक्याची शस्त्रक्रिया करताना एका महिलेस उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात जंतूसंसर्ग झाला़ त्यामुळे तिच्यावर लातूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली़

Family planning free surgery to survive! | कुटुंबनियोजनाची मोफत शस्त्रक्रिया जिवावर बेतली !

कुटुंबनियोजनाची मोफत शस्त्रक्रिया जिवावर बेतली !

 लातूर : कुटुंबनियोजनाची बिनटाक्याची शस्त्रक्रिया करताना एका महिलेस उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात जंतूसंसर्ग झाला़ त्यामुळे तिच्यावर लातूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली़ महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते़ तिचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला़ कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया गरीब कुटुंबातील महिलेच्या जीवावर बेतली. ललिताबाई मालू टाळीकुटे (३८, रा़ परतपूर, ता़ मुखेड) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे़ ललिताबाई मालू टाळीकुटे यांच्यावर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना २१ मे रोजी उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ आवश्यक ती तपासणी करून त्यांच्यावर बिनटाक्याची शस्त्रक्रिया करण्याचा वैद्यकीय अधिकारी प्रयत्न करीत असताना तिच्या पोटात शस्त्रक्रियेचे साहित्य गेले नाही़ दरम्यान, काही तासानंतर तिचे पोट फुगू लागले़ त्याचबरोबर अंगात तापही भरला़ ललिताबाई यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात शुक्रवारी रात्री दाखल करण्यात आले़ त्यांच्यावर शनिवारी साडेतीन ते चार तास शस्त्रक्रिया करण्यात आली़ त्यानंतर तिला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले़ तिची प्रकृती धोक्याबाहेर येत नसल्याने मंगळवारी रात्री कृत्रिमश्वासोश्वासही लावण्यात आला़ अखेर बुधवारी सकाळी रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ दरम्यान, उदगीर येथे बिनटाक्याची शस्त्रक्रिया करण्यात येत असताना जंतूसंसर्ग झाल्याने सदरील महिलेचे पोट फुगले व अंगात ताप भरला़ त्यामुळे तिची प्रकृती गंभीर झाली़ जंतूसंसर्गामुळे ती दगावली असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांचे म्हणणे आहे़ परंतु, जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडून अद्यापही त्यास दुजोरा मिळत नाही़ त्यामुळे उदगीर येथील डॉक्टराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे की काय? असा सवाल होत आहे़ (प्रतिनिधी) कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष... या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने आवश्यक ती गोळ्या- औषधे पुरविण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी खास काही कर्मचार्‍यांची नियुक्ती केली होती़ परंतु, हे कर्मचारी महिलेच्या नातेवाईकांजवळ आपला भ्रमणध्वनी क्रमांक देऊन गुल झाले़ त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना सोमवारी रात्री रक्तासाठी तर मंगळवारी रात्री औषधांसाठी धावपळ करावी लागली़ उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपल्या पत्नीचा मृत्यू झाला असल्याची फिर्याद रुग्णाचे पती मालू टाळीकुटे यांनी गांधी चौक पोलिसांत दिली. रुग्णाचे पोट फुगून ताप भरला तेथील डॉक्टरांनी रुग्णास घराकडे घेऊन जा अथवा खाजगी दवाखान्यात घेऊन जावा असा सल्ला देत पसार झाले़ याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़शस्त्रक्रियेवेळी इन्फेक्शन; महिला रुग्ण अत्यवस्थ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी सदरील महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन चार सदस्यीय समितीच्या उपस्थितीत करण्याच्या सूचना केल्या़ त्यामुळे बुधवारी स्त्रीरोग तज्ज्ञ, शल्य चिकित्सक, न्यायवैद्यशास्त्र तज्ज्ञ आणि पॅथॉलाजी तज्ज्ञ यांच्या समक्ष करण्यात आले़ अहवालानंतर कार्यवाही सदरील महिलेचा मृत्यू हा जंतू संसर्गामुळे झाला की अन्य दुसर्‍या कुठल्या कारणांमुळे हे अद्यापही सांगता येत नाही़ त्यामुळे यासंदर्भातील अहवाल आल्यानंतर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ सुधाकर शेळके यांनी सांगितले़ प्राथमिक चाचणीत सदरील रुग्ण महिलेस जंतूसंसर्ग झाल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Family planning free surgery to survive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.