फाटक्या, जीर्ण नोटा निराधारांच्या माथी
By Admin | Updated: November 29, 2015 23:16 IST2015-11-29T23:08:29+5:302015-11-29T23:16:14+5:30
लोहारा : येथील मराठवाडा ग्रामीण बँकेत सध्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या पगारी वाटपाचे काम सुरू आहे. परंतु, या

फाटक्या, जीर्ण नोटा निराधारांच्या माथी
लोहारा : येथील मराठवाडा ग्रामीण बँकेत सध्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या पगारी वाटपाचे काम सुरू आहे. परंतु, या लाभार्थ्यांना फाटक्या तसेच दहा रुपयांचे बंडल दिले जात असून, त्यातही बहुतांश नोटा या जीर्ण झालेल्या व फाटक्या आहेत. त्यामुळे या नोटांचे करायचे काय, असा प्रश्न या लाभार्थ्यांसमोर पडला आहे.
शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत गुरूवारपासून श्रावण बाळ, संजय गांधी या योजनेतील निराधार लाभार्थ्याच्या पगारींचे वाटप सुरू करण्यात आले आहे. मागील तीन महिन्यांपासूनच्या या पगारी जमा झाल्यामुळे सध्या बँकेत ही रक्कम उचलण्यासाठी लाभार्थ्यांची मोठी गर्दी होत आहे. गुरुवारी तर सकाळी आठ वाजल्यापासून बँकेसमोर गर्दी केली होती. परंतु, बँकेत कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी असल्यामुळे पगार वाटपाचे हे काम दुपारी बारानंतर सुरू करण्यात आले. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना या दिवशी रक्कम मिळू शकली नाही. त्यामुळे शुक्रवारीही अशीच गर्दी झाली होती. त्यामुळे या दिवशीही अनेकांना पगारीविनाच परतावे लागले.
या दोन दिवसाच्या पगारी वाटपावेळी बँकेकडून या लाभार्थ्यांना दहा-दहा रुपयांचे बंडल देण्यात आले. बँकेत गर्दी असल्यामुळे लाभार्थी ही रक्कम घेऊन लगेचच बँकेतून निघाले. परंतु, घरी येवून पाहिल्यानंतर या बंडलमध्ये देखील अनेक नोटा या फाटक्या तसेच काही जीर्ण झालेल्या तर काहींवर रंग चढल्याचे दिसून आले. बऱ्याचश्या नोटा चिटकविलेल्याही होत्या. बाजारात कुणीही या नोटा घ्यायला तयार नाही. त्यामुळे या नोटांचे आता करायचे काय, असा प्रश्न या लाभार्थ्यांसमोर पडला आहे. तसेच बँकेने लार्थांना चांगल्या नोटा द्याव्यात व शक्य झाल्यास शंभर, पन्नासच्या नोटांमध्ये रक्कम द्यावी, अशी मागणी लाभार्थ्यांमधून होत आहे. (वार्ताहर)