जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सोशल मीडियात फेक मेसेज व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 16:01 IST2020-07-03T16:00:49+5:302020-07-03T16:01:27+5:30
४ जुलैपासून वाळूज परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे, त्यातच समाजमाध्यमांमध्ये अशा प्रकारचे मेसेज फिरविण्यात येत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सोशल मीडियात फेक मेसेज व्हायरल
औरंगाबाद : कोरोनाच्या काळात सोशल मीडियातून अनेक फेक मेसेज फॉरवर्ड केले जात असून, त्याचा फटका जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनादेखील बसला. लवकरच कोरोना थर्ड स्टेजला पोहोचेल. त्यामुळे आपण सर्वांनी अतिदक्षता पाळण्याची गरज आहे. मांसाहार, ब्रेड, पाव बेकरी सामान बंद करा, यासह इतर सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या असल्याचा मेसेज समाजमाध्यमांमध्ये (सोशल मीडियात) फिरत आहे.
दरम्यान, हा फेक मेसेज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने माहिती विभागाकडून कळविण्यात आले आहे. ४ जुलैपासून वाळूज परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे, त्यातच समाजमाध्यमांमध्ये अशा प्रकारचे मेसेज फिरविण्यात येत आहेत. सदरील मेसेज नागरिकांमध्ये गैरसमज पसरविणारा असून, असा संदेश कुणालाही फॉरवर्ड करू नये, कुणी फॉरवर्ड करीत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने कळविले आहे.