नापास विद्यार्थ्यांनाही पदवी, आऊटसोर्सिंगमुळे गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 06:03 IST2018-07-14T06:03:38+5:302018-07-14T06:03:57+5:30
- राम शिनगारे औरंगाबाद : परीक्षेतील घोटाळ्यांमुळे सातत्याने चर्चेत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आता चक्क नापास विद्यार्थ्यांना ...

नापास विद्यार्थ्यांनाही पदवी, आऊटसोर्सिंगमुळे गोंधळ
- राम शिनगारे
औरंगाबाद : परीक्षेतील घोटाळ्यांमुळे सातत्याने चर्चेत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आता चक्क नापास विद्यार्थ्यांना पदव्यांचे वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यापीठाच्या बीसीए (बॅचलर आॅफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन) या अभ्यासक्रमात नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र विद्यापीठाने महाविद्यालयाला पाठविले आहे. दोन नापास विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व त्यांना विद्यापीठाने बहाल केलेल्या पदव्या ‘लोकमत’ला प्राप्त झाल्या आहेत.
विद्यापीठाने मार्च/एप्रिल २०१७मध्ये घेतलेल्या पदवी अभ्यासक्रमांच्या पदवी प्रमाणपत्रांचे वाटप या वर्षी पहिल्यांदाच महाविद्यालयांमार्फत होत आहे. मे महिन्यात झालेल्या विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यात केवळ पदव्युत्तर, एम.फिल. आणि पीएच.डी. प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
यंदा प्रथमच पुण्यातील ‘शेषासाई’ या खासगी कंपनीला प्रमाणपत्र छपाईचे कंत्राट देण्यात आले होते. कंपनीकडे शेवटच्या सत्रातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा ‘डाटा’ पाठविण्यात आला. मात्र, त्यातील अनेक विद्यार्थी नापास झालेले आहेत.
़प्रशासन अडचणीत
छापलेल्या प्रमाणपत्रांची उत्तीर्ण विद्यार्थ्यांनुसार पडताळणी करून महाविद्यालयांकडे पाठविण्याची आवश्यकता होती. मात्र परीक्षा भवनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुण्याहून आलेले प्रमाणपत्रांचे बॉक्स थेट महाविद्यालयांकडे सुपुर्द केले. नापास विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांचाही समावेश होता.
घडलेला प्रकार गंभीर आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर संबंधित विभागातील अधिकाºयांनी मला कळविणे गरजेचे होते. मात्र त्यांनी ते केले नाही. ‘लोकमत’कडूनच ही माहिती कळल्यानंतर उच्चस्तरीय बैठक घेत परिस्थितीचा आढवा घेतला. यात महाविद्यालयांना नापास विद्यार्थ्यांच्या पदव्या गेल्या खºया. मात्र, विद्यार्थ्यांना त्या पदव्यांचे वाटप झालेले नाही.
- डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू
‘त्या’ पदव्यांचा शोध
प्राथमिक अंदाजानुसार बीसीए, बीसीएस, व्यवस्थानशास्त्र विभागाच्या जवळपास ४० ते ५० नापास विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र छापलेल्यांमध्ये समावेश असून, इतर अभ्यासक्रमांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.आता परीक्षा भवनातील अधिकारी, संगणक विभाग नापास विद्यार्थ्यांच्या पदव्यांचा शोध घेत आहेत.