जनतेच्या पैशांवर सायबर गुन्हेगारांचा डोळा
By Admin | Updated: June 28, 2016 00:53 IST2016-06-28T00:41:04+5:302016-06-28T00:53:32+5:30
औरंगाबाद : अमुक बँकेतून बोलत आहे, तुमच्या एटीएम कार्डची मुदत संपलेली असून त्याचे नूतनीकरण करण्यासाठी एटीएम कार्डवरील १६ अंकांची माहिती सांगा

जनतेच्या पैशांवर सायबर गुन्हेगारांचा डोळा
औरंगाबाद : अमुक बँकेतून बोलत आहे, तुमच्या एटीएम कार्डची मुदत संपलेली असून त्याचे नूतनीकरण करण्यासाठी एटीएम कार्डवरील १६ अंकांची माहिती सांगा, मोबाईलवरील मेसेजची माहिती द्या, अशा प्रकारचा तुम्हाला फोन आला की, तुमची गाठ आॅनलाईन सायबर गुन्हेगाराशी पडलेली आहे, असे समजा. अशा प्रकारच्या फोनवर विश्वास ठेवून शहरातील सुमारे पावणेदोनशे एटीएम कार्डधारक, क्रेडिट कार्डधारकांना आॅनलाईन लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची फसवणूक झालेल्या नागरिकांमध्ये उच्चशिक्षितांचाही समावेश आहे.
जवळपास प्रत्येक नागरिकाचे बँकेत खाते असतेच. शहराप्रमाणे ग्रामीण भागातील बँकांनीही मोठ्या प्रमाणात बदल करून संगणकीय प्रणालीनुसार कामकाज सुरू केले आहे. बँकेने आपल्या प्रत्येक ग्राहकास एटीएम कार्डची सुविधा दिलेली आहे. याशिवाय ग्राहकांनी आॅनलाईन बॅकिंगच्या माध्यमातून आपले व्यवहार करावेत, अशी बँकेची अपेक्षा आहे. त्यामुळे उच्चशिक्षित वर्ग आता आॅनलाईन बॅकिंगचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहे. यात शहरातील लोकांची संख्या अधिक आहे. मात्र आॅनलाईन बॅकिंग आणि एटीएम कार्ड, क्रेडिट कार्डचा वापर करताना सुरक्षितता न पाळल्यास तुमच्या बँक खात्यातील रक्कम कोणत्याही क्षणी सायबर गुन्हेगार आॅनलाईन ढापू शकतात.
तिजोरीचे दार उघडे ठेवाल तर चोरी होणारच - सपोनि कल्याणकर
सायबर गुन्हेगार हे अत्यंत चाणाक्ष असतात. ते वेगवेगळ्या मार्गाने बँक ग्राहक, क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड आणि आॅनलाईन बॅकिंग करणाऱ्या लोकांची माहिती मिळवत असतात. त्यामुळे आॅनलाईन बॅकिंग करताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे. ग्राहकाने आपला पासवर्ड कधीही आणि कोणालाही सांगू नये. एवढेच नव्हे तर कार्ड स्वॅप करीत असताना अनोळखी व्यक्ती चोरून आपल्या पासवर्डची माहिती घेत आहे का, याबाबत सजग असावे. बँकेने सांगितलेले नियम पाळावेत. नाही तर तुमची तिजोरी उघडी राहते आणि चोर त्यावर दरोडा टाकतात. त्यामुळे प्रत्येकाने आॅनलाईन व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे असल्याचे सायबर गुन्हे सेलचे सहायक निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सांगितले.
सायबर गुन्हेगार हे रॅण्डम पद्धतीने बँक ग्राहकांना फोन करीत असतात. फोन उचलणाऱ्या व्यक्तीला तो गोड बोलून मी अमुक बँकेतून बोलत आहे. तुमच्या एटीएम कार्ड कार्डची मुदत संपलेली असून त्याचे नूतनीकरण करायचे असल्याने कार्डवरील १६ अंकांची माहिती द्या, असे सांगतो. अन्यथा तुमचे कार्ड कायमस्वरुपी बंद होईल, अशी थापही मारतो. आपले एटीएम कार्ड बंद होण्याच्या भीतीपोटी अनेक जण कार्डवरील माहिती देतात. त्या नंबरच्या आधारे भामटा कार्डचा पासवर्ड बदलत असल्याचे बँकेला कळवितो. त्यानंतर बँक ग्राहकाच्या मोबाईलवर पासवर्डच्या क्रमांकाचा मेसेज येतो, या मेसेजची माहिती हे गुन्हेगार पुन्हा फोन करून विचारून घेतात. त्या आधारे दुसरे एटीएम कार्ड बनवून फसवतात.