लातूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
By Admin | Updated: August 28, 2014 01:40 IST2014-08-28T01:31:25+5:302014-08-28T01:40:45+5:30
लातूर : लातूर जिल्ह्यात मंगळवार व बुधवारी सर्वदूर पाऊस झाला असून,

लातूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
लातूर : लातूर जिल्ह्यात मंगळवार व बुधवारी सर्वदूर पाऊस झाला असून, बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २०.९२ मि.मी. इतका पाऊस झाला. पोळ्याच्या पूर्वसंध्येपासून पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.
गेल्या महिनाभरापासून पावसाने ताण दिला होता. त्यामुळे दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. परंतु, पोळ्याच्या पूर्वसंध्येला सुरु झालेला रिमझिम पाऊस बुधवारपर्यंत कायम राहिला आहे. मंगळवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर मोठा पाऊस झाला. रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते. या पावसाळ्यात कोरडेठाक असलेल्या नदीपात्रात काहीअंशी पाणी आले आहे. बुधवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. अधूनमधून पावसाची रिपरिप सुरूच होती. जिल्ह्यातील लातूर, औसा, उदगीर, निलंगा, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ, अहमदपूर, रेणापूर, चाकूर या तालुक्यांत पाऊस झाला आहे.
मंगळवारी लातूर तालुक्यात १.५० मि.मी., औसा तालुक्यात १.४३, रेणापूर तालुक्यात १२.७५, उदगीर ३४, अहमदपूर ७.००, चाकूर ८.२०, जळकोट ३५, निलंगा १३.८८, देवणी २२.३३, शिरूर अनंतपाळ ८.५३ असा एकूण सरासरी १४.४४ मि.मी. पाऊस झाला आहे. तर बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत लातूर ३९.६२ मि.मी., औसा २४.८५, रेणापूर १६.००, उदगीर २६.७१, अहमदपूर ११.८३, चाकूर ३३, जळकोट २३, निलंगा ११.३८, देवणी १९.६६, शिरूर अनंतपाळ ३.६६ असा एकूण सरासरी २०.९२ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. हा पाऊस समाधानकारक नसला तरी शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतातील पिके वाळू लागली होती तर काही ठिकाणी कोमेजली होती. आता या पावसामुळे पिकांना उभारी येणार आहे. माना टाकत असलेली पिके कालपासून डोलू लागली आहेत.
जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा, रावणकोळा, अतनूर परिसरातही मंगळवारी रात्री मोठा पाऊस झाला. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले असून, नद्या, नाले व ओढ्यांना थोडे पाणी आल्याने बळीराजा सुखावला आहे. (प्रतिनिधी)
गतवर्षी जिल्ह्यात सरासरी ६०४.६२ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा २७८.०२ मि.मी. पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३२६.६ मि.मी.ने पाऊस कमी आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी झालेल्या पावसामुळे छोट्या नद्या-नाल्यांचे पात्र ओलावले आहे. परंतु, त्यात अद्याप वाहते पाणी नाही. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
४दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, बुधवारी रिमझिम पावसाची बरसात सुरू होती. शिवाय, सूर्यदर्शन न झाल्यामुळे आणखी पाऊस होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. लातूर शहरात मंगळवारी रात्री ९ वाजेपासून ११ वाजेपर्यंत पाऊस होता. शहरातील रस्त्यांवरून पाणी वाहत होते.