108 सेवेवर अतिरिक्त भार
By Admin | Updated: August 18, 2014 00:34 IST2014-08-18T00:02:59+5:302014-08-18T00:34:29+5:30
सुनील चौरे, हदगाव तालुक्यात २२ मार्च २०१४ पासून शासनाने १०८ क्रमांकावर तत्काळ उपलब्ध होणाऱ्या आपतकालीन सेवेसाठी ३ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या

108 सेवेवर अतिरिक्त भार
सुनील चौरे, हदगाव
तालुक्यात २२ मार्च २०१४ पासून शासनाने १०८ क्रमांकावर तत्काळ उपलब्ध होणाऱ्या आपतकालीन सेवेसाठी ३ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या खऱ्या, परंतु या रुग्णसेविका वाहनावर बाळंतपणाच्या रुग्णांचे ओझे वाढल्यामुळे आपतकालीन सेवेतील रुग्णांचा बळी जात आहे़
महाराष्ट्र शासनाने आपतकालीन सेवा यामध्ये अपघात, सर्पदंश, बर्निंग, नैसर्गिक आपत्ती, फाशी, इमारत कोसळणे आदी घटनातील रुग्णांना तत्काळ मदत मिळावी व त्यांचे प्राण वाचावेत यासाठी रुग्णवाहिका वाहनासोबत डॉक्टर व उपचाराची अद्ययावत यंत्रणासह ही सेवा सुरू केली़ परंतु तालुक्यात उठसुठ या वाहनाचा वापर करण्यात येत आहे़ तालुक्याला अद्ययावत उपजिल्हा रुग्णालय असूनही बाळंतपणासाठी रुग्ण या वाहनाचा शहरात येण्यासाठी उपयोग करत आहेत़ यामुळे ज्या रुग्णांसाठी हे वाहन उपलब्ध असायला पाहिजे त्यांना या छोटमोठ्या रुग्णामुळे वेळेवर वाहन मिळत नाही़ उपचाराला विलंब झाल्याने रुग्णांचा मृत्यूही होत आहे़
हदगाव, तामसा व कोळी या तीन ठिकाणी या वाहनाची सोय आहे़ त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील बाळापूर व अर्धापूर तालुक्यात १ वाहन आहे़ १०८ क्रमांकावर फोन केल्यानंतर तालुक्यातील व शेजारील तालुक्यातील वाहन उपलब्ध करून दिले जाते़ महाराष्ट्रात हदगाव तालुका प्रथम क्रमांकावर आहे़ मार्चपासून आतापर्यंत ३०० केसेस या वाहनाने हाताळल्या आहेत़ सुविधा चांगली आहे़ परंतु तिचा वापरही योग्यरित्या होणे अपेक्षित आहे़ जननी जिवनदायी सुरक्षा योजनेसाठी १०८ या क्रमांकावर वाहन उपलब्ध असते़ गरोदर मातेला त्यांच्या राहत्या घरून दवाखान्यात आणणे व बाळंतपण झाल्यानंतर शिशु व मातेला घरापर्यंत पोहचवण्याचे काम या वाहनाकडे असते़ यासाठी हदगाव दवाखान्याला दोन वाहने आहेत़ परंतु निधी नसल्यामुळे दोन महिन्यापासून हे वाहन बंद आहेत़
ही योजना केंद्र शासनाची असून त्या खात्याकडून वाहनाचा डिझेलखर्च, मेन्टेनंस यासाठी निधी मिळतो़ परंतु निधी बंद असल्यामुळे वाहने बंद आहेत़ उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी नुसती उठाठेव नको म्हणून गरोदर मातांना १०८ क्रमांकावरील वाहन उपलब्ध करून स्वत: गप्पागोष्टीत वेळ घालत आहेत़ क्रीटीकल केसमध्ये एखादाच रूग्ण जिल्हा रुग्णालयात पाठवला जातो़ परंतु येथे तज्ज्ञमंडळी उपलब्ध असूनही सर्रास पेशंट रेफर केले जातात़
१४ आॅगस्ट रोजी कोळी येथील नागरिकाने डिलेव्हरीसाठी या गाडीची मागणी केली़ परंतु येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, अथवा हदगावला दाखल करा तिथे उपजिल्हा रुग्णालय आहे असे डॉक़पिल वाठोरे यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना समजावून सांगितले़ त्यांनी त्यांचे ऐकले़ अर्ध्याच तासात वाळकीफाटा येथून या डॉक्टरास फोन आला़ त्यांच्या रुग्णाने विषारी औषध प्राशन केले होते़ आॅटोमध्ये त्याला हदगावला आणताना आॅटो नादुरूस्त झाला़ लगेच या वाहनाद्वारे हदगाव व तिथून नांदेडला तो रुग्ण नेण्यात आला़ यामुळे त्या रुग्णाचे प्राण वाचले व गरोदर मातेलाही उपचार मिळाले़
नागरिकांनी या वाहनाचा योग्य वापर करावा़ हट्ट किंवा राजकीय दबाव आणू नये, उपजिल्हा रुग्णालयातील १०८ क्रमांकाच्या जननी सुरक्षा जीवनदायी योजनेच्या गाड्या तात्काळ सुरू कराव्यात व क्रिटीकल केसेस सोडल्या तर इतर बाळंतपण येथेच करावेत़ गरजूंना या योजनेचा लाभ घेता येईल असे डॉ़प्रशांत मिरगेवाड यांनी सांगितले़