विस्तार अधिकारी चतुर्भुज
By Admin | Updated: June 10, 2014 00:58 IST2014-06-10T00:36:56+5:302014-06-10T00:58:42+5:30
गंगापूर : येथील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एल.जी. गव्हाणे यांना सरपंचाकडून ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने सोमवारी रंगेहाथ पकडले.

विस्तार अधिकारी चतुर्भुज
गंगापूर : येथील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एल.जी. गव्हाणे यांना सरपंचाकडून ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने सोमवारी रंगेहाथ पकडले.
रांजणगाव नरहरी पिंप्री गु्रप ग्रामपंचायत दप्तरी नोंद नसलेल्या मालमत्ता अतिक्रमण ठरवून पाडण्यात याव्यात, अशी मागणी गावातील काही मंडळींनी पंचायत समितीकडे केली होती. विस्तार अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास करून अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे पाठविला होता. यावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सरपंच नारायण सूर्यभान बाराहते यांना ३९/१ प्रमाणे आपले सरपंचपद रद्द का करण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटीस पाठविली होती. यावर विस्तार अधिकारी एल.जी. गव्हाणे यांनी सरपंच बाराहते यांच्याकडे कारवाई थांबवण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली. मात्र बाराहते यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून विस्तार अधिकारी एल.जी. गव्हाणे यांच्या विरोधात तक्रार दिली. ठरल्याप्रमाणे ९ तारखेला दुपारी लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक आर.टी. चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती परिसरात सापळा रचण्यात आला. दुपारी १ वाजेदरम्यान सरपंच नारायण बाराहते पंचायत समिती कार्यालयात आले, त्यावेळी विस्तार अधिकारी जागेवर होते.
बाराहते यांना पाहताच त्यांनी स्थापत्य विभागाच्या संगणक कक्षाकडे येण्याचा इशारा केला व पैशांची मागणी केली. बाराहते यांनी पाच हजार रुपये दिल्यानंतर दबा धरून बसलेल्या लाचलुचपत विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गव्हाणे यांच्यावर झडप घालून त्यांना ताब्यात घेतले. (वार्ताहर)
या प्रकरणी पंचायत समिती कार्यालयात पंचनामा करण्यात येऊन विस्तार अधिकारी गव्हाणे यांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक स.दे. बाविस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक भा.ब. पिंगट यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक आर.टी. चोपडे, पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, सुधाकर मोहिते, कैलास कामठे, विक्रम देशमुख, श्रीराम नांदुरे, अजय आवले, बाळासाहेब महाजन, संदीप चिंचोले आदींनी केली.