नाटकातून अनुभवा अजिंठ्याची अक्षरलेणी!

By Admin | Updated: November 5, 2014 00:59 IST2014-11-05T00:51:27+5:302014-11-05T00:59:59+5:30

औरंगाबाद : उत्कट आविष्काराचा शाश्वत सौंदर्यानुभव देणाऱ्या अजिंठ्याच्या लेण्यांना प्रख्यात नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्यबद्ध केले आहे.

Experiment with the alphabet! | नाटकातून अनुभवा अजिंठ्याची अक्षरलेणी!

नाटकातून अनुभवा अजिंठ्याची अक्षरलेणी!



औरंगाबाद : उत्कट आविष्काराचा शाश्वत सौंदर्यानुभव देणाऱ्या अजिंठ्याच्या लेण्यांना प्रख्यात नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्यबद्ध केले आहे. गज्वी व त्यांच्या चार मित्रांनी अनुभवलेला अजिंठा पाच नाट्यसंहितांच्या माध्यमातून उलगडला आहे.
इसवी सन पूर्व कालखंडात अनाम शिल्पकारांनी खोदून ठेवलेल्या या जिवंत कलाकृतींची भुरळ आजवर सामान्यांसह अनेक चित्रकार, कवी अन् नाटककारांना पडली आहे.
तीन वर्षांपूर्वी अजिंठ्याला भेट दिल्यानंतर या भव्य कलाकृतींमध्ये काही एक नाट्य दडल्याचा साक्षात्कार झाल्याचे गज्वी म्हणाले. ते सांगतात की, ‘मी माझे मित्र अरुण मिरजकर, भगवान हिरे, स्वप्नील गांगुर्डे व चांदे यांच्यासह अजिंठा लेणी पाहावयास गेलो. तो खरेतर दोनदिवसीय अभ्यासदौराच होता. या लेण्यांची स्थापत्य कला, शिल्पांच्या मुद्रेवरील बोलके भाव आणि चित्रांचे ताजे रंग पाहून आम्ही भारावून गेलो. त्यानंतर झालेल्या चर्चेतून या सगळ्यातील सौंदर्य आम्हाला जवळच्या असलेल्या नाट्यमाध्यमातून उभे करण्याचे आम्ही ठरवले. या लिखाणासाठी वर्षभराचा कालखंड निश्चित केला. दरम्यान, माझे नाटककार मित्र अशोक हंडोरे यांनीही या प्रयोगात सहभाग घेण्याची इच्छा दाखविली. त्यांनी काही वर्षांपूर्वी ही लेणी पाहिली होती. त्यांनीही एक नाट्यसंहिता यात लिहिली.
भगवान हिरे यांना नाटक लिहिणे शक्य झाले नाही. मात्र, ते वगळता सगळ्यांच्या मिळून पाच संहिता सध्या हाती आल्या आहेत. मी लिहिलेल्या ‘द बुद्धा’ या नाटकात भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मापासून महानिर्वाणापर्यंतचा पट उलगडला आहे.
बुद्धांच्या जीवनासह त्यांचे तत्त्वज्ञान, त्यांचे पत्नी यशोधरेशी असलेले नाते यावरही प्रकाश टाकला आहे. बुद्धांना काहीशा अपारंपरिक, नव्या रूपात समोर आणण्याचा हा प्रयत्न आहे.’ ही पाचही नाटके ‘अजिंठा’ या एकाच कल्पनेवर आधारित असली तरी प्रत्येक नाटककाराची स्वतंत्र दृष्टी, कलाविषयक धारणा व सौंदर्यानुभव यातून केलेली अभिव्यक्ती नवी असेल, असेही गज्वी म्हणाले.
मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात या नाटकांचे वाचन झाले आहे. त्यात या नाटकांवर सांगोपांग चर्चा झाली असून, काही योग्य बदल करीत नवी भरही घातली गेली.
येत्या काळात या नाटकांचा विशेष महोत्सवही आयोजित करण्याचा मानस असल्याचे गज्वी म्हणाले. सध्या पाचही नाटकांसाठी योग्य दिग्दर्शक-कलावंत शोधण्यासह आर्थिक बळ उभे करण्याचे काम सुरू आहे.
‘कलेसाठी कला की जीवनासाठी कला’ या सनातन वादाकडे लक्ष वेधताना गज्वी म्हणाले की, या वादापेक्षाही ‘ज्ञानासाठी कला’ असा एक तिसरा अर्थवाही पर्याय डोळ्यांसमोर ठेवत आम्ही बोधी नाट्यचळवळ चालवतो. माणसाच्या उन्नयनासह जगणे सुंदर करण्यासाठी आम्ही कला सादर करतो. ‘अजिंठा’ नाट्यमहोत्सव हा यासाठीच केलेला अट्टहास असेल.

Web Title: Experiment with the alphabet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.