ढगाळ वातावरणाने महाबळेश्वरची अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:28 IST2020-12-17T04:28:32+5:302020-12-17T04:28:32+5:30

औरंगाबाद : शहरात आज रविवारी सलग दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच असलेल्या ढगाळ वातावरणाने महाबळेश्वरची अनुभूती आली. शहर परिसरातील डोंगर ढगांमध्ये ...

Experience of Mahabaleshwar with cloudy weather | ढगाळ वातावरणाने महाबळेश्वरची अनुभूती

ढगाळ वातावरणाने महाबळेश्वरची अनुभूती

औरंगाबाद : शहरात आज रविवारी सलग दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच असलेल्या ढगाळ वातावरणाने महाबळेश्वरची अनुभूती आली. शहर परिसरातील डोंगर ढगांमध्ये गुडूप झाले होते. दरम्यान, अशा वातावरणात सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास रिमझिम पावसाने हजेरी लावली.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने शहरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. भर हिवाळ्यात डिसेंबर महिन्यात ढगाळ आणि अवकाळी पावसाला सामोरे जावे लागत आहे. रविवारच्या सुटीमुळे अनेकांची पावले शहर परिसरातील डोंगरांकडे वळली होती. ढगाळ वातावरणामुळे महाबळेश्वरप्रमाणे वातावरणाचा अनुभव नागरिकांना आला. सायंकाळी काही वेळेसाठी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या.

ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात घसरण झाली होती. चिकलठाणा वेधशाळेत कमाल तापमान २५.७ आणि किमान तापमान १७.९ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. आणखी काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मात्र, जोरदार गारपिटीची शक्यता कमी असल्याचे हवामानतज्ज्ञांनी सांगितले. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषत: लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

चौकट.............

२० तारखेनंतर थंडी

मराठवाड्यात गारपिटीची शक्यता नाही. तसेच फार पाऊसही पडणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. आगामी १९ तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. २० डिसेंबरनंतर थंडीला सुरुवात होईल. औरंगाबादेतील किमान तापमान ८ अंश सेल्सिअसखाली जाण्याची शक्यता आहे.

- प्रा. किरणकुमार जोहरे, हवामान तज्ज्ञ

Web Title: Experience of Mahabaleshwar with cloudy weather