१७ कोटी ५० लाखांचा खर्च अपेक्षित

By Admin | Updated: August 7, 2014 02:08 IST2014-08-07T01:09:13+5:302014-08-07T02:08:46+5:30

जाधववाडीतील जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीने व्हिजन- २०१८ हा व्यवसाय विकास आराखडा तयार केला आहे

Expected to spend 17 crores 50 lacs | १७ कोटी ५० लाखांचा खर्च अपेक्षित

१७ कोटी ५० लाखांचा खर्च अपेक्षित

प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद
जाधववाडीतील जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीने व्हिजन- २०१८ हा व्यवसाय विकास आराखडा तयार केला आहे. याद्वारे सिमेंटचे रस्ते, गोदाम, फूल बाजार, शीतगृह, शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणीपासून ते पेट्रोल पंपापर्यंतच्या ३५ प्रकल्पांचा समावेश आहे. यासाठी १७ कोटी ५० लाखांचा खर्च बाजार समिती आपल्या उत्पन्नातून करणार आहे. यातील काही प्रकल्प विविध शासकीय योजनांतून करण्यात येणार आहेत.
भविष्यातील खाजगी बाजार समित्यांशी स्पर्धा करण्यासाठी आणि बाजार समित्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने राज्य पणन मंडळाने राज्यातील २९९ बाजार समित्यांना व्यवसाय विकास आराखडा तयार करण्यास सांगितले होते. याअंतर्गत जाधववाडीतील बाजार समितीने २०१८ पर्यंतचा विकास आराखडा तयार केला. उल्लेखनीय म्हणजे, आजपर्यंत बाजार समित्यांना व्हिजनच नव्हते. मात्र, या विकास आराखड्याने बाजार समित्यांना नवी दृष्टी प्राप्त झाली आहे. येत्या चार वर्षांत आपणास कोणत्या कामावर लक्ष केंद्रित करायचे, हे आता निश्चित झाले आहे.
मागील वर्षीचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
बाजार समितीने पाच वर्षांचा व्यवसाय विकास आराखडा तयार केला आहे. त्यातील २०१३-२०१४ या आर्थिक वर्षात ४ हजार मे. टन क्षमतेचे गोदाम उभारणे, ६ हजार मे. टन क्षमतेचे मका संकलन केंद्र उभारणे, बीओटी तत्त्वावर फुलांचे स्वतंत्र मार्केट उभारणे, सेल हॉल क्र.२ च्या आजूबाजूस रस्त्याचे काँक्रिटीकरण, डांबरीकरण करणे या प्रस्तावांना अजूनही पणन मंडळाची मंजुरी मिळाली नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या मालाची ग्रेडिंग व्यवस्था करण्यासाठी चाळणी यंत्र उभारणे, संरक्षण भिंतीचे काम करण्यास मंजुरी मिळाली.
व्यवसाय विकास आराखड्यातील प्रस्तावित कामे
१ २०१४- २०१५ मध्ये मुख्य रस्ता डांबरीकरण, काँक्रिटीकरण करणे, फळे व भाजीपाला या मालासाठी सुसज्ज कोल्ड स्टोरेजची उभारणी करणे, किराणा मार्केटला प्लॉट देऊन विकसित करणे आदी कामांचा समावेश आहे.

२ २०१५- २०१६ मध्ये फळे, भाजीपाला मार्केट व जनरल शॉपिंग सेंटरमध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी बांधणे, पे अ‍ॅण्ड यूज तत्त्वावर स्वच्छतागृहाची उभारणी करणे, बाजार समितीचे संपूर्ण कामकाजाचे संगणकीकरण करणे, शेतकऱ्यांसाठी आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे.
३ २०१६- २०१७- शेतकऱ्यांसाठी सुधारित शेतीचे मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारणे, व्यापारी व शेतकऱ्यांच्या वाहनांसाठी पेट्रोल पंप उभारणे, अ‍ॅग्रो प्रोसेसिंग युनिट उभारणे, भुसार मालाचे हार्वेस्टर खरेदी करणे.

४ २०१७- २०१८- वाहनतळाची उभारणी करणे, बँकेची शाखा उघडणे, घनकचऱ्यापासून गांडूळ खताची निर्मिती करणे, शेतकऱ्यांना नाममात्र किमतीत भोजनाची व्यवस्था करून देणे, ५० मे. टनचा काटा बसविणे, पिसादेवी रोडवर शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बांधकाम करणे,
शीतवाहन खरेदी तसेच अत्याधुनिक टॉली बेल्ट आदींची खरेदी करणे हे प्रमुख प्रस्ताव आहेत.
प्रस्ताव पाठविणे सुरू
लवकरच मंजुरी
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव एन.ए. अधाने यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षातील ६ विकासकामांचे प्रस्ताव पणन मंडळाकडे पाठविण्याचे काम सुरूआहे. या व्हिजन- २०१८ मुळे बाजार समितीला नवीन दृष्टी मिळाली आहे. पायाभूत सुविधा निर्माण करण्याची नियोजनबद्ध आखणी करण्यात आल्याने त्याचा फायदा शेतकरी, व्यापारी व ग्राहकांना होणार आहे. यातूनच बाजार समितीचे उत्पन्नही वाढणार आहे.
कृउबाचे प्रशासक अनिलकुमार दाबशेडे म्हणाले, कृउबाने पहिल्यांदाच व्हिजन- २०१८ हा व्यवसाय विकास आराखडा तयार केला आहे. यात एकूण ३५ प्रस्ताव आहेत. त्यातील चालू आर्थिक वर्षातील ४ प्रस्ताव तयार करून पाठविण्यात येत आहेत. तसेच मागील वर्षातील काही प्रस्ताव आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आधी हे प्रस्ताव मंजूर व्हावे, यासाठी मी प्रयत्न करीत आहे.
चार वर्षांत उत्पन्न १२ कोटींवर पोहोचणार!
बाजार समितीने तयार केलेल्या आराखड्यात २०१७-२०१८ या वर्षापर्यंत बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न १२ कोटी १० लाखांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २०१३-२०१४ या आर्थिक वर्षात ७ कोटी ५६ लाख वार्षिक उत्पन्न दाखविण्यात आले आहे. दरवर्षी बाजार समिती ३ कोटी ४८ लाख रुपये विकासकामांवर खर्च करणार आहे.

Web Title: Expected to spend 17 crores 50 lacs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.