कुलगुरुपदाच्या उरकल्या मुलाखती
By Admin | Updated: May 30, 2014 01:01 IST2014-05-30T00:44:03+5:302014-05-30T01:01:43+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी राज्यपाल नियुक्त कुलगुरू शोध समितीने दोन दिवस आयोजित केलेल्या मुलाखतीचा कार्यक्रम एकाच दिवसात गुंडाळला.

कुलगुरुपदाच्या उरकल्या मुलाखती
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी राज्यपाल नियुक्त कुलगुरू शोध समितीने दोन दिवस आयोजित केलेल्या मुलाखतीचा कार्यक्रम एकाच दिवसात गुंडाळला. गुरुवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत २७ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतीच्या कार्यक्रमाकडे मात्र, दोन जणांनी पाठ फिरविल्याचे सूत्राने सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुलगुरू निवड प्रक्रिया राज्यपालांमार्फत राबविण्यात येते. याअंतर्गत जानेवारी महिन्यात पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. सुमारे ६५ जणांनी कुलगुरू शोध समितीकडे अर्ज सादर केले होते. त्यापैकी २९ उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम २९ आणि ३० मे रोजी मुंबई विद्यापीठातील कलिना सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सात उमेदवारांचा समावेश आहे. कुलगुरू शोध समितीने मात्र, दोन दिवस चालणार्या मुलाखती एकाच दिवशी उरकल्या. प्रत्येक उमेदवारास केवळ २० मिनिटे एवढाच वेळ देण्यात आला होता. या काळात त्यांना विद्यापीठाबद्दलच्या त्यांच्या संकल्पना, विचार समितीसमोर सादर करावयाचे होते. त्याकरिता त्यांना पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनही सादर करण्याची मुभा होती. यानुसार प्रत्येक उमेदवाराने किमान ४५ मिनिटांपेक्षा अधिक कालावधी मिळेल, असे गृहीत धरले होते. प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी त्यांना केवळ २० मिनिटांतच आपणच कसे सर्वोत्तम उमेदवार आहोत हे पटवून द्यावे लागले. कुलगुरू शोध समितीतर्फे पाच जणांच्या नावांची शिफारस राज्यपालांकडे केली जाणार आहे. या पाच उमेदवारांना राजभवनातून बोलावणे येणार आहे. राज्यपाल हे स्वत: पाचही उमेदवारांशी थेट संवाद साधतील. त्यानंतर ते कुलगुरूची निवड जाहीर करतील. ही प्रक्रिया दोन दिवसांत पूर्ण होणार असल्याचे सूत्राने सांगितले. कुलगुरूपदाच्या मुलाखतीचा केवळ सोपस्कार पूर्ण करण्यात आला आहे. कुलगुरूच्या निवडीकडे संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागून आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रा. डॉ. देवानंद शिंदे, डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. वि.ल. धारूरकर, डॉ. व्ही. बी. भिसे, डॉ. बी. एस. वाघमारे, डॉ. वाय. के. खिल्लारे, डॉ. एम. बी. मुळे या मातब्बर प्राध्यापकांनी कुलगुरू निवड समितीसमोर गुरुवारी मुलाखती दिल्या.